‘अंतर्नाद’च्या शाडूची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळेला 310 गणेशप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

चिमुकल्या हातांनी साकारले शाडूमातीचे आकर्षक गणेश


310 Ganesha Lovers Spontaneous Participation in Workshop Make Ganesha Idol of Shadu of ‘Antarnad’ भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा निशुल्क कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. यंदा उपक्रमाचे तिसरे वर्ष होते. या कार्यशाळेत भुसावळ परीसरातील 310 पर्यावरणप्रेमी गणेशभक्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जास्तीत-जास्त गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नेत्ररोग तज्ञ डॉ.नि.तु.पाटील, प्रशिक्षक हितेंद्र नेमाडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे यांनी तर सूत्रसंचालन जीवन महाजन आणि आभार समन्वयक तेजेंद्र महाजन यांनी मानले. 4 ते 15 वर्षे वयोगटाचे 310 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले. मूर्ती कला प्रशिक्षक हितेंद्र नेमाडे यांनी तंत्रशुद्ध शैलीत मार्गदर्शन केले आणि मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अनेकांनी या कार्यशाळेचा लाभ घेत आकर्षक गणरायाच्या मूर्ती साकारल्या.

यांची कार्यशाळेला उपस्थिती
प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे, प्रकल्प समन्वयक तेजेंद्र महाजन, सहसमन्वयक भूषण झोपे यांनी आयोजन, नियोजनाची जबाबदारी पार पाडली. उपक्रम समिती सदस्य योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, ज्ञानेश्वर घुले, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, ललित महाजन, सचिन पाटील, अध्यक्ष संदीप पाटील यांनी परीश्रम घेतले.

उपक्रमाचे नवे व्यासपीठ
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची चळवळ या माध्यमातून उभी राहील. कार्यशाळेला जो उदंड प्रतिसाद मिळाला तो उत्साह वाढवणारा आहे, असे प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे म्हणाले. शाडूमातीची मूर्ती बनविण्याचा आनंद शब्दातीत असतो. या मूर्तीचे विसर्जन पाण्यात लवकर होते. अर्थात, उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहते. मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अंतर्नादच्या या कार्यशाळेच्या मोठा हातभार लागणार असून हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार प्रशिक्षक हितेंद्र नेमाडे म्हणाले.

आदर्श उपक्रम
मोबाईल आणि टीव्हीच्या काळात अश्या कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा नक्कीच विकास होईल आणि सोबतच पर्यावरण रक्षणालाही हातभार लागेल. अंतर्नादचा हा उपक्रम नक्कीच आदर्श, असा उपक्रम आहे अश्या भावना युवराज लोणारी यांनी व्यक्त केल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !