नाभाभाऊंचे अजित पवारांना खुले आव्हान : विशेषाधिकार असल्याचा जीआर दाखवा !
Nabhabhau’s open challenge to Ajit Pawar : Show the privilege of GR! जळगाव : जालन्यातील मराठा समाज आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुन कुठलेही आदेश देण्यात आले नसल्याचा दावा केला होता शिवाय हे आदेश वरून आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू, राजकारण सोडून देऊ, असं आव्हान दिले होते. या आव्हानावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना प्रतिसवाल केला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून काय विशेषाधिकार आहेत, याचा जीआर दाखवा, असे चॅलेंजच अजित पवारांना दिले आहेत.
उपमुख्यमंत्री हे नामाभिधान
अजित पवारांच्या चॅलेंजवर एकनाथ खडसेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. उपमुख्यमंत्री हे नामाभिधान असते, त्यांना कुठलाही विशेषाधिकार उपमुख्यमंत्री म्हणून नसतो. मग हे सांगताना मला विशेषाधिकार आहे, असा एखादा जीआर त्यांनी दाखवावा. एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज करत असताना एकनाथ खडसेंनी आदेश दिला म्हणून लाठीचार्ज होईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

मग तो वरिष्ठ कोण?
जालन्याच्या एसपींनी पहिल्याच भेटीत सांगितलं की, लाठीचार्ज करायच्या सूचना मला वरीष्ठांकडून मिळाल्या. मग हा वरिष्ठ कोण असू शकतो, त्यांच्यापेक्षा जो वरिष्ठ आहे तोच असू शकतो. एखादी घटना घडली तर त्याची अंतिमत: जबाबदारी ही गृह खात्यावर असते, गृहखात्याच्या मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वेमंत्री राजीनामा, गोवारीचं हत्याकांड झालं तर मंत्र्याचा राजीनामा. मग, इथं लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही असं म्हणण योग्य नाही, ती त्यांचीच जबाबदारी आहे. दरम्यान, मी फडणवीसांचा राजीनामा मागणार नाही. कारण, मी मागितल्यावर देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील, असं वाटत नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले.
