उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का : या माजी मंत्र्यांनी पाठवला राजीनामा
Another big blow to Uddhav Thackeray : This former minister sent his resignation नाशिक : जळगाव दौर्यावर आलेले ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकीकडे राज्यासह केंद्रावर टिकेचे बाण चालवले असताना दुसरीकडे या गटातील माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे उपनेते पदाचा राजीनामा पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी बबनराव घोलप यांची ओळख असून घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे त्यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी धक्का समजला जात आहे.
शिर्डीतील तिकीटामुळे नाराज असल्याची चर्चा
शिर्डी येथे नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा नाराजीतून दिल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसातील घडामोडीनंतरच राजीनाम
घोलप म्हणाले की, मी कट्टर शिवसैनिक आहे. केवळ नाशिकच नाही तर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी सर्वात पहिली शिवसेना शाखा सुरू करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी पाहूनच मी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाघचौरे यांचा प्रवेश अन घोलप यांची नाराजी
घोलप यांची नाराजी खासकरुन अहमदनगर जिल्हा आणि त्यातही शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत आहे. काही दिवसांपूर्वीच माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. ही बाबच घोलप यांना खटकली आहे. वाकचौरे यांच्यामुळेच अनेक सर्वसामान्य शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला.
या दौर्यात ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे वाघचौरे यांना पुढे पुढे करीत होते. ठाकरे यांच्या दुष्काळ पाहणी दौर्याविषयी मला किंवा जिल्हा प्रमुखालाही काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर थेट सामनामधूनच कळाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा संपर्कप्रमुखपद बदलण्यात आला आहे. माझ्याऐवजी अन्य कुणाची नियुक्ती केली आहे. अशा पद्धतीने जर सर्व घडत असेल तर सहाजिकच मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करणे पसंत करेल, असे घोलप यांनी सांगितले.

