आमदार अपात्रता प्रकरण : उद्धव ठाकरेंनी घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट
MLA disqualification case: Uddhav Thackeray met NCP chief Sharad Pawar मुंबई : राज्यात मराठा आरक्षण प्रश्न पेटल्यानंतर त्यावरून राजकारण तापल्यानंतर आता राष्ट्रवादीतील आमदार अपात्रता प्रकरणही चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीलाही 14 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. या दोन्ही आमदारांच्या अपात्रेवरील याचिकेवर विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणी सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. यावेळी, शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते.

बंडखोर आमदार अपात्रतेनंतर बदलणार राज्यात चित्र
शरद पवार यांनी या भेटीचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. राज्यात भाजपाने महायुती सरकार स्थापन केले असून आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंगही फुंकलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून बंडखोर आमदारांवरील कारवाईसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे.

