चाळीसगावातील व्ही.एच.पटेल विद्यालयाच्या चेअरमनपदी जितेंद्र आनंदा वाणी यांची निवड
चाळीसगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालय, श्याम भगवानदास अग्रवाल बालक मंदिर व आनंदा सुपडू वाणी शिशू विकास या शाळा समितीच्या चेअरमनपदी विद्यमान संचालक जितेंद्र आनंदा वाणी यांची बुधवारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी निवड केली. नियुक्तिचे पत्र अग्रवाल यांच्याहस्ते वाणी यांना देण्यात आले.
रीक्त जागेवर वर्णी
कनसिंग राजपूत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदावर उंबरखेडे येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कनकसिंग राजपूत यांचीही निवड करण्यात आली. पटेल विद्यालयास प्राथमिक शिक्षणाची 67 वर्षाची परंपरा असून शाळेत शिशू विकास ते इयत्ता 1 ली ते 4 थीचे वर्ग भरतात. विद्यार्थी पटासंख्या एक हजाराहून अधिक आहे. माफक शुक्लात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञानही दिले जाते. 2006 मध्ये शाळेचा सुवर्ण महोत्सव देखील साजरा झाला आहे. जितेंद्र वाणी यांचे वडिल कै. आनंदा सुपडू वाणी यांनीही याच शाळेचे 11 वर्ष चेअरमनपद भूषविले आहे. वडिलांनंतर जितेंद्र वाणी यांना संधी मिळाल्याने ते काहीसे भावूक झाले.

नारायणदास अग्रवाल हे संस्थेत गेल्या 60 वर्षापासून विद्यार्थी केंद्रबिंद, शिक्षक मानबिंदू असा वसा घेऊन नेतृत्व करीत आहे. त्यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली शाळेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आग्रेसर राहू, अशी ग्वाही यावेळी बोलतांना वाणी यांनी दिली.
निवडी प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर.सी.पाटील, आ.बं.मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, चाळीसगाव महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश स्वारा, मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन अड. प्रदीप अहिरराव, एच.एच.पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन अशोक बागड, कळंत्री प्राथ. विद्यालयाचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष भोजराज पुंन्शी, संचालक योगेश करंकाळ, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, मुख्याध्यापक के.एन.तडवी, मंजुषा नानकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी करीत आभारही मानले.

