भुसावळातून दुचाकींची चोरी : चोरट्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी ः अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयित अल्प दरात दुचाकींची विक्री करीत असल्याने त्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. सैय्यद शाहरूख सैय्यद रहेमान (29, पंचशील नगर, भुसावळ), दानिश उर्फ गोलू शरीफ खान (24, दीनदयाल नगर, भुसावळ) व कामीलोद्दीन अजीजद्दोनीन (30, फैजपूर, त.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींनी बाजारपेठ हद्दीतील तीन, शहर हद्दीत एक तर जळगावसह, जामनेर व अमळनेर पोलिस ठाणे हद्दीतून लांबवलेली दुचाकी काढून दिली आहे. पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान आणखी काही चोर्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.
स्वस्तात विक्री अन् पडल्या बेड्या
संशयित सैय्यद शाहरूख सैय्यद रहेमान व दानिश उर्फ गोलू शरीफ खान हे दोघे मित्र असून दिवसा टेहळणी करून दुचाकींची चोरी करीत होते व अल्प किंमतीत या दुचाकींची विक्री फैजपूरातील कामीलोद्दीन अजीजद्दोनीन यास करीत होते. संशयित कामीलोद्दीन याने ग्रामीण भागात स्वस्तात दुचाकींची विक्री करीत कागदपत्रे महिनाभरानंतर देण्याचे आश्वासन देत ग्रामीण भागातील लोकांकडून पैसेही उकळले ही माहिती खबर्याने बाजारपेठ पोलिसांना दिल्यानंतर संशयितांवर आठ दिवस पाळत ठेवण्यात आली. सुरूवातीला सैय्यद शाहरूखच्या मुसक्या आवळल्यानंतर अन्य दोन संशयितांची नावे समोर आल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.


सात दुचाकी संशयितांकडून जप्त
संशयितांनी बाजारपेठ हद्दीतून बजाज पल्सर, सुजूकी, बजाज प्लॅटीना तसेच शहर हद्दीतून बजाज प्लॅटीना तसेच जळगाव शहर हद्दीतून बजाज प्लॅटीना, जामनेर हद्दीतून बजाज पल्सर व अमळनेर पोलिस ठाणे हद्दीतून हिरो होंडा स्प्लेंडर लांबवल्याची कबुली देत सातही गाड्या काढून दिल्यानंतर त्या जप्त करण्यात आल्या. सात दुचाकी चोरीबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अनेक गुन्हे उघडकीस येणार
तीनही संशयितांना शुक्रवारी अटक केल्यानंतर भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीत आरोपींनी यापूर्वी आणखी कुठून गाड्यांची चोरी केली याची माहिती समोर येणार आहे. संशयित दानीश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार सुनील जोशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.
18 बेवारस वाहनांना मिळाले मालक
बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी बाजारपेठची धुरा हाती घेतल्यानंतर काही महिन्यांपूर्वी भुसावळसह मलकापूरातील तीन संशयितांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरी केलेल्या नऊ दुचाकी जप्त केल्या होत्या तर विविध भागात बेवारसरीत्या आढळलेल्या तब्बल 18 दुचाकी जप्त केल्यानंतर त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेवून या दुचाकी त्यांना परत करण्यात आल्या.
