रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार प्रदान
भुसावळ : भारतीय रेल्वेत उत्कृष्ठ सेवा बजाविल्याची दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते अति विशिष्ठ रेल्वे सेवा पुरस्कारान मध्य रेल्वेतील सात वरीष्ठ अधिकार्यांचा गौरव करण्यात आला. मध्य रेल्वेने सात वैयक्तिक पुरस्कार आणि चार विभागीय शिल्ड पटकाविल्यात. नागपूर, मुंबई, पुणे, भुसावळ व सोलापूर येथील अधिकार्यांचा गौरव करण्यात आला. यात भुसावळ येथे कार्यरत असलेले तत्कालिन वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांचा समावेश आहे.
यांचा पुरस्काराने गौरव
केंद्रीय रेल्वे वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवार, 15 डिसेंबरला 68 व्या केंद्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यात रेल्वे कर्मचार्यांमध्ये सर्वोत्तम कार्यपद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणार्या रेल्वे कर्मचार्यांना पुरस्कार प्रदान केले. ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-2023’ भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. विभागीय रेल्वे, पीएसयूंना विशिष्ट क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी शिल्ड प्रदान केले. यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य, सर्व विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वेच्या उत्पादन युनिटचे प्रमुख तसेच रेल्वेचे सार्वजनिक उपक्रम अधिकारी उपस्थित होते.



तीन अधिकारी व चार कर्मचार्यांचा सन्मान
देशभरातील एकूण विविध विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट आणि रेल्वे सार्वजनिक उपक्रम मधील 100 रेल्वे कर्मचारी (50 अधिकारी आणि 50 कर्मचारी) यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी 21 शिल्डसह सन्मानित केले. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली ट्रेन धावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 10 ते 16 एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा केला जातो. रेल्वे सप्ताहादरम्यान, संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये कार्यक्रम आयोजित होतात. यंदाच्या वर्षासाठी मध्य रेल्वेतील तीन अधिकारी व चार कर्मचारी यांना सन्मानित केले. या पुरस्कार सोहळ्यास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) व अधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वेच्या मिळालेल्या शिल्ड या जीएम व अधिकारी यांनी स्विकारल्यात.
यांना मिळाले पुरस्कार
जयप्रकाश दिवांगण (नागपूर), धर्मेंद्र कुमार (मुंबई), सुनील डी.नैनानी (मुंबई), संजय रामचंद्र पोळ (सोलापूर), विवेक एन.होके (सोलापूर), सुधांशू मित्तल (पुणे), डॉ.शिवराज पी. मानसपुरे (भुसावळ, हल्ली मुंबई मुख्य जनसंपर्क अधिकारी) यांना गौरविण्यात आले. वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त विभागीय स्तरावर उत्कृष्ट विभागीय कामगिरीसाठी विविध शिल्ड प्रदान केले. एकूण 21 विभागीय शिल्डपैकी, मध्य रेल्वेने उत्कृष्ट कामगिरीसाठी चार विभागीय शिल्ड पटकावले.
अश्या मिळाल्या शिल्ड
सर्वसमावेशक हेल्थ केअर शील्ड (वैद्यकीय) – प्रदान केलेल्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधांसाठी
स्टोअर शील्ड (मटेरिअल मॅनेजमेंट) – हे शिल्ड पश्चिम रेल्वेसोबत शेअर केले गेले.
कार्मिक विभाग शिल्ड – कर्मचारी कल्याणासाठी घेतलेल्या विविध ऑनलाइन उपायांसाठी
पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड – सौर ऊर्जा आणि इतर ऊर्जा संवर्धन उपायांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि
स्वच्छतेच्या कामगिरीसाठीची ही सलग चौथी वेळेस मिळाली.

