नागपूरातील एक्सप्लोझीव कारखान्यात स्फोट : नऊ जागीच ठार
मृतांचा आकडा वाढण्याची भीती : मृतांमध्ये सहा महिलांसह तीन पुरूषांचा समावेश
Explosive factory explosion in Nagpur: Nine killed on the spot नागपूर : नागपूरातील कोंढाळी-नागपूर मार्गावरील सोलार एक्सप्लोसीव कंपनीत रविवारी सकाळी नऊ वाजता सीबीएच 2 या ईमारतीत भीषण स्फोट झाल्यानंतर त्यात सहा महिलांसह तीन पुरूषांचा मृत्यू ओढवला. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून कंपनी पराीसर सील करण्यात आला आहे.
यांचा ओढवला मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटात युवराज किसनाजी चारोडे (बाजारगाव), ओमेश्वर किसनलल मछिर्के (चाकडोह, ता.नागपूर), मिता प्रमोद उईके (अंबाडा सोनक, ता.काटोल, जि.नागपूर), आरती निळकंठा सहारे (कामठी, जि.नागपूर), श्वेताली दामोदर मारबते (कन्नमवार, जि.वर्धा), पुष्पा श्रीरामजी मानापुरे (शिराला, जि.अमरावती), भाग्यश्री सुधाकर लोनारे भुज, (ब्रम्हपुरी), रुमीता विलास उईके (ढगा, जि.वर्धा), मोसम राजकुमार पटले (पांचगाव, जि.भंडारा) यांचा मृत्यू ओढवला.






कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम होते सुरू
रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात हा स्फोट झाला. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. घटनास्थळी आमदार अनिल देशमुख दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिले आहे.


