भुसावळातील यावल रोडसह जामनेर रोड अतिक्रमण मुक्त
50 टपर्यांचे अतिक्रमण हटवले : रस्त्यावरील फलकांसह दुकानदारांचे साहित्य जप्त
Jamner Road encroachment free along with Yaval Road in Bhusawal भुसावळ : शहरातील यावल रोडसह जामनेर रोडवरील अतिक्रमण गुरुवार, 12 ऑक्टोंबर 2023 रोजी पालिकेने हटवले होते मात्र तीन महिन्यात अतिक्रमण धारकांनी पुन्हा वर्दळीच्या रस्त्यांवर टपर्या थाटल्याने ‘परीस्थिती जैसे’ झाल्यानंतर शुक्रवार. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून विशेष मोहिम उघडून अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यात आला. कारवाईपूर्वीच अनेक व्यावसायीकांनी आपल्या अतिक्रमण टपर्या हटवल्या. यावल रोडवरील साईजीवन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ तसेच तहसील कार्यालय व डी.एस.हायस्कूलला लागून अतिक्रमण अतिक्रमण तसेच जामनेर रोडवरील थेट नाहाटा चौफुलीपर्यंत पालिकेने कारवाई करीत 50 हून अतिक्रमण हटवल्याने व्यावसायीकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. शहरातील मुख्य वर्दळीच्या चौकातील टपर्या थाटण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने पालिकेने अतिक्रमणाविरोधात आता नियमित मोहिम उघडली आहे.
यांचा कारवाईत सहभाग
पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात बांधकाम विभाग अभियंता रीतेश बच्छाव, आस्थापना प्रमुख वैभव पवार, आरोग्य निरीक्षक व्ही.सी.राठोड, जाहिरात संकलन विभागाचे अनिल भाकरे, विविध विभागांचे कर्मचारी 50 मोहिमेत सहभागी झाले. एक जेसीबी व दोन ट्रॅक्टरची मदत घेत अतिक्रमण हटवण्यात आले व तत्पूर्वी उद्घोषणा करून अतिक्रमण हटवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.


कारवाईपूर्वीच हटवल्या टपर्या
शुक्रवारी सकाळी 11 वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपजवळून मोहिम सुरू झाली मात्र पथक येण्यापूर्वीच अनेकांनी रस्त्यावरील टपर्या रात्रीच उचलल्या तर काहींनी सकाळी धावपळ करीत टपर्या हलवल्या. शहरातील सेंट अलॉयसीस हायस्कूलसमोर खाद्य पदार्थत तसेच अन्य विक्रेत्यांमुळे सर्वात जास्त वाहतूक कोंडी होत असल्याने या भागात जेसीबी फिरवून जागा सपाट करण्यात आली. वारंवार टपरीधारक अतिक्रमण करताना दिसल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासकांनी यावेळी दिला.

विक्रेत्यांचे साहित्य केले जप्त : दंड होणार
डी.एस.हायस्कूलला लागून अनेक विक्रेत्यांनी टपर्या थाटल्यानंतर प्रशासकांनी तातडीने सर्व अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले तर अनेक व्यावसायीकांनी सूचना देवूनही साहित्य न उचलल्याने दुकानांचे फलक, लोखंडी बाकडे पथकाने ट्रॅक्टरमध्ये टाकून जप्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते तहसील कार्यालयादरम्यानचे अतिक्रमणही हटवण्यात आले. त्यानंतर जामनेर रोडवरील बाजारपेठ पोलिस ठाणे ते नाहाटा चौफुलीदरम्यान मोहिम राबवण्यात आली. यावेळी अनेकांनी रस्त्यावर दुकानांचे फलक लावल्याने हे फलक तोडण्यात आले तर पाट्याही जप्त करण्यात आल्या. कारवाईनंतरही व्यावसायीक पुन्हा रस्त्यावर टपर्या ठेवत असल्याने यापुढे रस्त्यावर टपरी दिसल्यास ती जप्त करून संबंधितांना प्रति दिवस दहा हजार रुपये दंड आकारावा, असे निर्देश प्रशासकांनी यावेळी दिले.
दर आठवड्याला अतिक्रमणाचा घेणार आढावा
शहरातील यावल रोड व जामनेर रोड सर्वाधिक वर्दळीचा आहे मात्र या रस्त्यावर सातत्याने अतिक्रमण वाढत चालल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत आहे. तीन महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटवूनही पुन्हा टपर्या थाटण्यात आल्यानंतर शुक्रवारी अतिक्रमण हटवण्यात आले मात्र पुन्हा टपर्या थाटण्यात येवू नये यासाठी आता दर आठवड्याला प्रशासक अतिक्रमणाचा आढावा घेणार आहेत व त्यानंतर पथकातर्फे तातडीने अतिक्रमण हटवण्यात येईल, असेही प्रशासकांनी सांगितले.
