रीधूरी खूनात समोर आले हे धक्कादायक कारण : तिघा आरोपींना अटक
Shocking reason that came to light in Ridhuri murder: Arrest of three accused यावल : यावल तालुक्यातील रीधूरी गावात सोमवारी रात्री 40 वर्षीय इसम एकास मोबाईलवर साल्या म्हणून बोलत असताना शेजारील महिलेने आपल्या पतीलाच शिवीगाळ केल्याचा भ्रम केल्याने त्यावरून वाद उफाळला. या वादातून 40 वर्षीय धनराज वासुदेव सोनवणे यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी मंगळवारी सहा संशयितांविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली.
किरकोळ वाद बेतला जीवावर
फैजपूर पोलिस ठाण्यात सोनी धनराज सोनवणे (रीधूरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनराज वासुदेव सोनवणे (40) हे सोमवारी रात्री पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास कामानिमित्त उमेश नामक व्यक्तीशी मोबाईलवर बोलत होते व थट्टा-मस्करीत ते साल्या-साल्या असे बोलले व शेजारील रहिवासी आरती सतीष सोनवणे यांनी आपल्याच पतीला धनराज सोनवणे शिविगाळ करीत असावे, असा भ्रम झाला व या संशयावरून वाद उफाळला. सतीष सुकदेव सोनवणे याने लोखंडी पाईपने धनराज सोनवणे यांच्या डोक्यावर वार केला तसेच युवराज सुकदेव सोनवणे, दीपक युवराज सोनवणे, आरती सतीष सोनवणे, मीना युवराज सोनवणे व यमुनाबाई सुकदेव सोनवणे (सर्व रा.रीधूरी, ता.यावल) यांनी मारहाण केल्याने धनराज सोनवणे हे जागीच ठार झाले.


याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तीन संशयीतांना अटक करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे.
