एणगाव येथे वीज चोरी करतांना दोघांना पकडले : दंड न भरल्याने गुन्हा
Two caught stealing electricity at Engaon : Crime for non-payment of fine यावल : एणगाव, ता.बोदवड या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत गावात दोन जण वीज चोरी करतांना आढळले. दोघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र दोघांनी दंड भरला नाही. याप्रकरणी यावल पोलिसात बुधवारी दोघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे वीज चोरी प्रकरण
एणगाव, ता.बोदवड येथील गुणवंता व नियंत्रण कक्षाचे सहाय्यक अभियंता राहुल चौधरीसह विशाल पवार, वैभव वाघ, निलेश चौधरी या पथकाने गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवली. यामध्ये त्यांना मारुती गोविंदा वराडे हे वीज चोरी करतांना आढळून आले. त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना सहा हजार 80 रुपये दंड व तडजोड आकार दोन हजार आकारून नोटीस देण्यात आली. ज्ञानेश्वर बाबूराव पाटील हे देखील वीज चोरी करतांना आढळून आले. त्यांनादेखील सहा हजार 80 रुपये इतक्या दंडासह तडजोड आकार दोन हजार आकारून नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनी वेळेत दंड भरला नाही. दंड न भरल्याने यावल पोलिसात सहाय्यक अभियंता राहुल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे.


