यावल शहरातील चार मोबाईल टॉवर महसूल कर थकवल्याने सील
Four mobile towers in Yaval city sealed due to tax evasion यावल : यावल शहरातील चार मोबाईल टॉवर महसूल विभागाचा कर अदा न केल्याने सील करण्यात आले. गुरुवारी तहसीलदारांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी व तलाठी यांनी ही कारवाई केली. या चार टॉवरकडे तीन लाख 23 हजार 889 रुपये थकीत आहे. टॉवर सील केल्याने मोबाईल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
कारवाईने थकबाकीदारांच्या गोटात खळबळ
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने कर वसुली मोहिम सुरू केली आहे. यावल शहरात असलेल्या विविध 10 मोबाईल टॉवरपैकी रीलायन्स व इंडेक्स या दोन कंपन्यांच्या चार टॉवरकडे तब्बल तीन लाख 23 हजार 889 रुपये थकीत होते. यात एकट्या रीलायन्सकडे एक लाख 61 हजार 949 रुपये थकीत असून इतर तीन टॉवरकडे प्रत्येकी 53 हजार 980 रुपये थकीत आहे. संबंधित टॉवर धारकांना वेळेत कर अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र त्यांनी कर अदा न केल्याने गुरुवारी मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी श्वेता ससाने, तलाठी प्राजक्ता पाटील, तलाठी ईश्वर कोळी, कोतवाल ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप पाटील या पथकाने शहरातील चार टॉवर सील केले आहे. मोबाईल टॉवर सील केल्याने शहरातील काही भागात मोबाईल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत पूर्ण कर अदा होत नाही तोपर्यंत या चार टॉवरची सेवा पूर्वरत होण्य शक्य नाही, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.


