यावल शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 22 गावांमध्ये आज मिरवणुका, कीर्तन, महाप्रसाद
यावल : शहर व तालुक्यात अयोध्येतील श्री राम मंदिरातील श्री राम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात दोन ठिकाणी तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 22 गावांमध्ये मिरवणुकीस कीर्तन व महाप्रसाद वितरणचे आयोजन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी शोभायात्रेचे आयोजन
सर्वच ठिकाणी यावल पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. अयोध्या येथे सोमवारी श्री राम मंदिरामध्ये श्री राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्त यावल शहरात फैजपूर रोडवरील श्री पारनेरकर महाराज मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. ही शोभायात्रा गणेश नगर, विरार नगर, सातोद रस्त्यावरील कन्या शाळा मार्गे श्रीराम नगर, शनी मंदिर, भगवा चौक, बुरूज चौक, छत्रपती संभाजी महाराज पेठ, महाजन गल्ली, म्हसोबा मंदिर, जिजामाता चौक, गवत बाजार, बारीवाडा चौक, चावडीकडून न्यायालय मार्ग व तेथून रेणुका माता मंदिरात जाईल आणि शिवाजी नगरातून श्री व्यास मंदिरात या संपूर्ण मिरवणुकीची सांगता होईल त्याचप्रमाणे सुंदर नगरीत देखील भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक म्हसोबा मंदिरापासून तर मेन रोड, आयडीबीआय बँक, रेणुका माता मंदिर, बोरावल गेटपर्यंत येणार आहे.


कलश यात्रा व मिरवणुकीसह महाप्रसादाचे आयोजन
शहरातील या दोन मिरवणुका असून सकाळी 11 वाजेपासून सातोद रस्त्यावरील श्रीराम नगरात महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. थोरगव्हाण, मालोद, गिरडगाव, दहिगाव, सावखेडासीम, आडगाव, किनगाव खुर्द, किनगाव बुद्रुक, नायगाव, चितोडा, शिरसाड, चुंचाळे, वड्री, वाघळूद, महलखेडी, विरावली, सातोद, सांगवी, कोळवद या गावात दिंडी सोहळा, कलश यात्रा व मिरवणूक काढली जाणार आहे.
अट्रावलला पुरातन श्रीराम मंदिरात दीपोत्सव
अट्रावल या गावात पुरातन श्रीराम मंदिर आहे या श्रीराम मंदिरामध्ये गावकर्यांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढल्यानंतर मंदिरामध्ये तब्बल 2100 दिवे प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करीत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जाणार आहे. वड्री या गावात सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आहे, वाघळूद या गावात महाप्रसाद आणि भक्तीमय गीताचा कार्यक्रम आहे. तसेच सातोद गावात महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.