एकही नारा… एकही नाम…, जय श्रीराम… जय श्रीराम… !
श्रीरामोत्सव : भुसावळ विभागात प्रभू श्रीरामांचा जयघोष : राम भक्तांच्या उत्साहाला उधाण
भुसावळ : अयोध्या येथील श्री राम मंदिरातील श्री राम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी भुसावळ शहरासह विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी भव्य स्क्रीनद्वारे सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. जागोजागी दाराबाहेर आकर्षक रांगोळी काढण्यात आली तर श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांना बुंदीसह पेढे व केळीचा प्रसाद वाटप करण्यात आला तर सजीव शोभायात्रांनी लक्ष वेधले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एकही नारा… एकही नाम…, जय श्रीराम… जय श्रीराम… ! असा जयघोष करण्यात आला.
यावलला सजीव देखाव्यांसह मिरवणुकीने वेधले लक्ष
यावल : शहरात अयोध्या येथील श्री राम मंदिरातील श्री राम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी दुपारी चार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. फैजपूर रस्त्यालगत असलेल्या श्री पारनेरकर महाराज मंदिरापासून पारंपरीक वाद्य, वृंदाच्या गजरात सजीव देखाव्यासह निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक-भक्त सहभागी झाले. संपूर्ण शहरातून मार्गस्त होत रात्री श्री महर्षी व्यास मंदिरात मिरवणुकीचा समरोप झाला.


साडेतीन हजार नागरीकांना प्रतिमा भेट
फैजपूर येथील डीवायएसपी सह पोलिसांची मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवला होता. अयोध्या येथे सोमवारी श्री राम मंदिरामध्ये श्री राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. या पार्श्वभूमीवर यावल शहरात फैजपूर रोडवरील श्री पारनेरकर महाराज मंदिरापासून दुपारी चार वाजेला भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. मंदिराजवळ दिनेश क्षिरसागर, परसाडे सरपंच मीना तडवी, प्रा.मुकेश येवले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आरती पार पडली. या ठिकाणी उपस्थित शहरातील तब्बल तीन हजार 500 नागरीकांना अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिमा भेट देण्यात आली व शोभायात्रेला सुरवात झाली. ही शोभायात्रा गणेश नगर, विरार नगरकडून सातोद रस्त्यावर आली. तेथून श्रीरामनगरकडून पेठेच्या श्रीराम व शनी मंदिराजवळ मिरवणूक आली येथे सामूहिक आरती पार पडली. तेथून पुढे बुरूज चौक, छत्रपती संभाजी महाराज पेठ, महाजन गल्ली, म्हसोबा मंदिर, जिजामाता चौक, गवत बाजार, बारीवाडा चौक, चावडी, न्यायालयामार्गकडून रेणुका माता मंदिरमार्गे शिवाजी नगरातून श्री व्यास मंदिरात ही मिरवणुक रात्री पोहचली. येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत फैजपूर सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, पोलिस निरीक्षक रकेश मानगावकर, उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सहायक फौजदार असलम खान, सुशील घुगे, भूषण चव्हाण, वासुदेव मराठे सह आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.
श्रीराम शोभायात्रेत साकारला सजीव देखावा
भुसावळ : जामनेर रोडलगत असलेल्या रामानंद नगर, दुर्गा कॉलनी परीसरातील कपिलेश्वर महादेव मंदिरातर्फे परीसरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचे सजीव देखावे साकारण्यात आले. सोमवारी सकाळी 11 वाजेपासून मंदिर आवारात मंडप टाकून मोठ्या स्क्रीनद्वारे अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दाखवण्यात आला. प्रभू श्रीरामाची भूमिका कुमारी भक्ती हिने, लक्ष्मणाची भूमिका सिद्धी हिने, सीतेची भूमिका लावण्या हिने तर हनुमानाची भूमिका दिशांत या मुलाने साकारली. परीसरातील विविध नगरांमधून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सडा घालून रांगोळी काढण्यात आली. सजीव देखाव्यांची घराघरासमोर पूजा आरती करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान तुषार सराफ यांच्या घरासमोर पाच जोडप्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. शोभायात्रा मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर तेथे सामूहिकरित्या रामरक्षा स्तोत्र म्हणण्यात आले. त्याचे नेतृत्व चंद्रकांत महाराज व लक्ष्मण महाराज यांनी केले. शोभायात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. शोभायात्रा यशस्वीतेसाठी कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
फैजपूर शहर राम नामाने दुमदुमले
फैजपूर : सार्या विश्वाचे लक्ष वेधलेल्या श्री क्षेत्र राम जन्मभूमी अयोध्या मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने अध्यात्म धार्मिक ऐतिहासिक फैजपूर नगरीत विविध धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील पुरातन जागृत असलेल्या श्रीराम मंदिर विश्वस्तांच्या वतीने गेल्या सात दिवसापासून राम कथेचे व धार्मिक पूजा अनुष्ठान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सोमवार, 22 जानेवारी रोजी राम प्रहरापासूनच विश्वस्त नरेंद्र नारखेडे यांनी सहपत्नीक पारंपरीक गुढी उभारून सोहळ्यात आनंद भरला. मूर्ती महाअभिषेक होम हवन, शंख घंटानाद, सामूहिक महा आरतीद्वारा दुपारी समापन करण्यात आले. शहरातील घरा-घरातून व वाड्या-वाड्यातून टाळ मृदंग श्रीरामाच्या घोषणा निणादात पावली नृत्य खेळत मोठ्या धार्मिक जल्लोषात शोभा यात्रेद्वारे भाविकांचे जथ्थे श्रीराम मंदिरात दाखल होवून प्रभू श्रीराम चरणी नतमस्तक झाले.
दीपावलीपेक्षाही मोठ उत्साह
यावेळी मंदिर आवारता अनेक भाविकांनी चहापाणी, दूध, अल्पोपहार, फळे मिठाई आदींचे वाटप केले. सोमवारी दुपारी दोन वाजता खंडोबा देवस्थानत सामूहिक बजरंग पाठ करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता सव्वा लाख रामज्योतींचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री आठ वाजता प्रत्येक गल्लीबोळात वाडा-वाड्यात कॉलनीमध्ये रस्ते फुला पाकळ्यांनी रांगोळ्यांनी दिव्यांनी सजवण्यात आले. सामूहिक श्रीरामपूजन महाआरती व स्नेह भोजनाचा सामूहिक उपक्रम राबविण्यात आला व फटाक्यांची आतिषबाजी करीत श्रीराम दीपावली साजरी केली.