कुर्‍हेपानाचेनजीक कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा : भुसावळातील 11 संशयित जाळ्यात

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाची कारवाई : सहा लाखांचा मुद्देमाल


Betting on chicken fight near Kurhepana: 11 suspects in Bhusawal भुसावळ : कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा लावणार्‍या भुसावळसह फैजपूर व नाशिकमधील 11 सट्टेबाजांना भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांकडून तीन हजार सहाशे रुपयांची रोकड, दोन कोंबडे, मोबाईल व दुचाकींसह एकूण पाच लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवार, 8 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुर्‍हेपानाचे शिवारातील एका शेतात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने सटोडियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

विशेष पथकातील हवालदाराची माहिती
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या पथकातील पोलीस हवालदार सुरज पाटील यांना तीन दिवसांपूर्वीच कुर्‍हेपानाचे गावाजवळील एका शेतात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर हार-जीतचा खेळ (सट्टा) खेळवला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुक्याचे निरीक्षक बबन जगताप व सहकार्‍यांना कारवाईचे निर्देश दिले.



पाच लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त
कुन्हा शिवारातील रईस बागवान यांच्या लिंबुच्या मळ्या शेजारी असलेल्या परीसरात झुडूपांमध्ये 16 संशयित दोन कोंबड्याची झुंज लावून त्यावर पैशांचा हार-जीतचा खेळ खेळत असताना पथाकाने छापेमारी केली. यावेळी 11 संशयितांना पकडण्यात पथकाला यश आले तर दोन फायटर कोंबडे, तीन हजार सहा रुपयांची रोकड, सहा हजार रुपये किंमतीचे सहा मोबाईल तसेच 14 दुचाकी मिळून एकूण पाच लाख 86 हजार 600 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या आरोपींवर झाली कारवाई
शेख सईद शेख सादीक (23, कंडारी झोपडपट्टी), शेख जावेद शेख हाफीज (38 पंधरा बंगला सरस्वती नगर, भुसावळ), आशिष राजेश सोनी (21, भारत नगर, सातारा), नेलसन लेनीन पेट्रो (43, गांधी नगर, भुसावळ), शेख आरीफ शेख युसूफ (31, जुने नाशिक, सारडा सर्कल, नाशिक), मोसीन शेख युसूफ (32, मुस्लीम कॉलनी, खडका), शेख सलमान शेख सलीम (26, कंडारी), रशीद सैय्यद निसार (42, डांगपूरा, मन्यारवाडा, यावल), शेख शहेबाज शेख अकबर (23, ग्रीनपार्क, भुसावळ), अर्जुन बादल गरड (24, फैजपूर), शेख इमाम शेख याकुब (38, खडका रोड, भुसावळ) व अन्य पाच ते सहा अनोळखीविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुकचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहा.निरीक्षक विशाल पाटील, एएसआय विठ्ठल फुसे, हवालदार युनूस शेख, हवालदार संजय तायडे, हवालदार प्रेमचंद सपकाळे, हवालदार संजय भोई, जितेंद्र साळुंखे, कॉन्स्टेबल विशाल विचवे, कॉन्स्टेबल जगदीश भोई तसेच भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, हवालदार संकेत झांबरे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !