चिंचोली परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरण : केंद्रप्रमुखासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

सतत दुसर्‍या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ : पेपर सुटण्याच्या वेळीच कारवाई


Chincholi exam center copying case : Case against five persons including the head of the center यावल : यावल तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी परीक्षेत विद्यार्थिनी कॉपी बाहेर फेकताना आढळताच फैजपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी शिक्षणाधिकारी यांना सूचना केल्यानंतर केंद्रप्रमुखासह पर्यवेक्षक अशा पाच जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावल तालुक्यात हा सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षक आले तणावात
ऐन पेपर संपण्याच्या वेळेवरच दोन्ही ठिकाणी कारवाई झाल्याने पर्यवेक्षकांचे काम करणारे शिक्षक मात्र प्रचंड तणावात सापडले आहे. या कारवाईमुळे शिक्षकांच्या संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत यावल पोलीस ठाण्यात एकत्र जमले. एखाद्या विद्यार्थ्याने कुठलातरी कागद जरी बाहेर फेकला तरी अशा प्रकारे शिक्षकांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी रोष व्यक्त केला.
चिंचोली, ता.यावल येथे सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. शनिवार, 9 रोजी येथे इयत्ता दहावीचा पेपर सुरू असता पेपर दोन वाजता संपणार त्याच वेळी या केंद्रावर फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी भेट दिली. वर्गाबाहेरून त्या जात असतांना वर्ग क्रमांक 5 वर्ग क्रमांक 6 आणि वर्ग क्रमांक 11 मधून विद्यार्थिनींनी कॉपीचा कागद बाहेर फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने यावलचे शिक्षण अधिकारी यांना सुचना करीत कारवाई करण्याचे आदेश दिले.



यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
यावल पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून केंद्र प्रमुख बाळू पितांबर पाटील, केंद्र उपप्रमुख सतीश रामदास पाटील, पर्यवेक्षक विनायक दगडू कोष्टी, पर्यवेक्षक कल्याणी राहुल महाले, पर्यवेक्षक स्वीटी विनायक पवार या पाच जणाविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विधीनिष्ठ परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1982 चे कलम 7,8 सह कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !