अवैध वाळू माफीयांची पुन्हा दादागिरी : फैजपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला धडक देत ठार मारण्याचा प्रयत्न


An attempt was made to hit and kill the vehicle of Assistant Superintendent of Police of Faizpur फैजपूर : जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांची दादागिरी अद्यापही थांबली नसल्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरचा पाठलाग करणार्‍या फैजपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग व त्यांच्या पथकाच्या खाजगी वाहनाला धडक देऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना शुक्रवार, 8 रात्री साडेअकरा वाजता हिंगोणा शिवारातील एच.पी.पेट्रोल पंपासमोर घडली. या घटने प्रकरणी डंपर मालक, चालक व क्लीनर अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून  दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी डंपर चालक मयूर सुरेश कोळी (30, डांभूर्णी, ता.यावल) याला अटक केली आहे.

पोलिसांच्या वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न
सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना यावल रोडवर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीस नाईक अल्ताफ अली, दिलीप तायडे, गणेश मनोरे, सुमित बाविस्कर यांच्या पथकाला खाजगी वाहना द्वारे (एम.एच.02 बी.झेड.2986) सोबत घेत हिंगोणा शिवारातील एच.पी.पेट्रोल पंपासमोर थांबवले. यावेळी यावलकडून फैजपूरकडे जात असलेल्या अवैध वाळूचा डंपर (एम.एच.40 एन.6588) ला इशारा करून थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र डंपर भरधाव वेगाने पुढे गेल्यानंतर पथकाने पाठलाग सुरू केला. यावेळी डंपर चालकांने वारंवार पोलिसांच्या वाहनाला साईडला दाबून नंतर मागून धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही मात्र धडक दिल्यानंतर डंपर साईडला शेतात पलटी झाले.



यावेळी पोलीस पथकाने डंपर चालक मयूर कोळी व क्लीनर प्रशांत उर्फ दादू पुरुषोत्तम पाटील (डांभूर्णी, ता.यावल) यास अटक केली तर या प्रकरणात डंपर मालक ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव तायडे (कोळन्हावी) याला ही आरोपी करण्यात आले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून पोलीस नाईक अल्ताफ अली यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक निलेश वाघ फौजदार बबन पाटोळे तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !