भुसावळात चिमुकल्याचा नालीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू
बालकाच्या मृत्यूनंतर खडका रोडवर पालिकेकडून स्वच्छतेला सुरूवात
Unfortunate death of toddler in Bhusawal after falling into drain भुसावळ : तीन वर्षीय बालक खेळत असताना अचानक नाल्यात पडून मृत झाला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता खडका रोडवर घडली. या घटनेनंतर पालिका प्रशासनाविरोधात मोठा रोष उफाळला होता. या अनुषंगाने पालिकेने या भागातील नाल्यांची स्वच्छता सुरू केली आहे. दरम्यान, यापूर्वीही खोल नाल्यांमुळे अप्रिय घटना घडल्यानंतरही पालिकेकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने जनक्षोभ वाढला आहे.
खेळताना चिमुकला पडला नालीत
अरसलान उर्फ बाबू बिहारी (3) हा चिमुकला आपले वडील नसरूद्दीन बिहारी यांच्यासह बिलाल कांडप केंद्राजवळील दुकानावर रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आला होता. वडिल कामात असताना चिमुकला खेळत होता व खेळताना तो खोल नाल्यात (गटारीत) पडला. तासाभरानंतरही मुलगा दिसत नसल्याने पित्याची चिंता वाढली व त्यांनी मुलाचा शोध सुरू केला तर सोशल मिडीयावरही चिमुकला हरवल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली. एव्हाना सायंकाळ झाली मात्र चिमुकल्याचा पत्ता लागत नसल्याने पालकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. चिमुकल्याच्या शोधासाठी माजी नगरसेवक आशिक खान शेर खान यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चिमुकला खेळताना नाल्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर 30 फूट नाल्यात उतरून बालकाला बाहेर काढण्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.


मध्यरात्री दफनविधी
मध्यरात्रीच्या सुमारास मयत अरसलान उर्फ बाबू बिहारी (3) या बालकावर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. यावेळी आई-वडिलांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. मयत बालकाच्या पश्चात आई, वडिल, तीन भाऊ असा परिवार आहे.