धुळे-बर्‍हाणपूर बसचा भीषण अपघात : 12 प्रवासी जखमी

ट्रकने मारला कट : अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार


Dhule-Berhanpur bus accident: 12 passengers injured रावेर : धुळे शहराकडून बर्‍हाणपूरकडे निघालेल्या बसला ट्रकने कट मारल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 प्रवासी जखमी झाले. हा अपघात रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गावाजवळील स्मशानभूमीजवळ सोमवारी सकाळी घडला. या बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करीत होते. यातील प्रकृती गंभीर असलेल्या पाच प्रवाशांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. या अपघाताबाबत निंभोरा पोलिसात नोंद करण्यात आली.

ट्रकने कट मारल्याने अपघात
बस चालक डी.डी.पाटील व वाहक एस.एस.जाधव हे सोमवारी पहाटे पाच वाजता धुळ्याहून बर्‍हाणपूरसाठी बस (क्रमांक एम.एच.40 वाय.5197) घेवून रवाना झाल्यानंतर सोमवारी सकाळी 9.45 वाजता विवरे बुद्रुक स्मशानभूमीजवळ समोरून येणारा ट्रक (क्रमांक एच.आर.55 एक्स 2983) ने कट मारल्याने बसचा एका बाजूकडील भाग कापला जावू 12 प्रवाशी जखमी झाले. अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला उतरली तर बस चालकाची कॅबीन यात चक्काचूर झाली आहे. ट्रक चालक घटनास्थळी ट्रक सोडून पसार झाला.



जखमींवर रावेरात उपचार
जखमी झालेल्या प्रवाश्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसमध्ये त्यावेळी एकूण 50 प्रवासी प्रवास करत होते. जखमी प्रवासी नासीनबी सय्यद युनूस (55, रा.साकळी), हुसेन इमाम कुरेशी (60), महेबी अयुब शेख (17), सानिया इमाम कुरेशी (17), सारीका मोरे (40) या पाच प्रवाश्यांना पुढील उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले तर ममता याकुब तडवी (60, रा.तडवी कॉलनी, रावेर), युसूफ खान रज्जाक खान (65, रा.जाम मोहल्ला सावदा), नजमाबी युसूफ खान (62, रा.जाम मोहल्ला, सावदा), जावेद शेख शरीफ (10, रा.जाम मोहल्ला, सावदा) यांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख स्वरुपात महामंडळाच्यावतीने आगार व्यवस्थापक विजय पाटील, वाहतूक नियंत्रक योगेश जोशी यांच्याहस्ते तातडीची मदत देण्यात आली. बसमधील जखमी प्रवाश्यांना मिळेल त्या वाहनांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता वैदकीय अधिकारी डॉ.शुभांगी चौधरी, डॉ.कृष्णा पाटील, डॉ.कुश भदोरिया यांच्यासह सहकार्‍यांनी प्रथमोपचार केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !