एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात


A bribe of 1000 was demanded: Wireman in Varangaon in ACB’s net भुसावळ : नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणी करणार्‍या वरणगाव शहरातील वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ अमीन शहा करामत शहा (33, वरणगाव शहर) यास जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. विशेष म्हणजे लाचखोर अमीन शहा यांना सापळ्याचा संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डरची मोडतोड केली.

असे आहे लाच प्रकरण
वरणगाव शहरातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या घराला नवीन वीज मीटर बसवण्यासाठी त्यांनी यापूर्वीच वीज कंपनीच्या कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता शिवाय डिमांड नोट भरण्यात आली होती. त्यानंतर डिमांड नोटची झेरॉक्स प्रत तसेच सही-शिक्का मारून त्याची ओसी घेण्यात आली. तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा यांना वीज मीटर केव्हा बसवणार ? याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी मंगळवारी केल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.



सापळ्याचा संशय येताच व्हाईस रेकॉर्डर तोडले
मंगळवारी दुपारी एसीबीने सापळा रचला मात्र तक्रारदाराचे हावभाव पाहून वायरमन अमीन शहा यांना संशय आला व त्यांनी तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर काढून त्याची मोडतोड केली मात्र तत्पूर्वी त्यात एक हजार रुपये लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने लागलीच लाच मागणी केल्याप्रकरणी संशयिताला अटक करीत त्याच्याविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !