भुसावळातील ड्रग्ज प्रकरण : चौघा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी


भुसावळ : भुसावळातील ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी स्थानिक तिघांसह मुंबईतील ड्रग्ज पुरवठादाराच्या मुसक्या बांधल्या होत्या. संशयितांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

राज्यभरात ड्रग्ज पेडलरांची साखळी
भुसावळातील हॉटेल मधुबनमध्ये संशयित ड्रग्ज विक्रीसाठी आल्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून मंगळवार, 19 रोजी रात्री ड्रग्जचा बाजार उधळण्यात आला होता. यावेळी कुणाल भरत तिवारी (30, प्लॉट नंबर 24, तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वालाड्यारेस (28, रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगाव रोड, भुसावळ) या संशयितांकडून 72 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 910 ग्रॅम मेथाक्वॉलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला तर संशयितांनी हे ड्रग्ज दीपेश मुकेश मालवीय (31, लाल जैन मंदिरामागे, भुसावळ) याने दिल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली तर मालवीय याच्या चौकशीत हे ड्रग्ज मुंबईहून आणल्याचे स्पष्ट होताच पथकाने मुंबई येथून मृदुल चंपकलाल वैद्य (31, भुलेश्वर, चर्नी रोड, मुंबई) यास अटक केली होती. अटकेतील संशयितांना सुरूवातीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीत आरोपींचे राज्यभरातील साथीदार कोण, ड्रग्जचे पुरवठादार आदी बाबी समोर येण्याची शक्यता आहे शिवाय राज्यभरातील ड्रग्ज पेडलरांचे नेटवर्कही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक गजानन पघडन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !