डोणगाव-डांभुर्णी रस्त्यावर दुचाकी अपघात : दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा


यावल : यावल तालुक्यातील डोणगाव ते डांभूर्णी दरम्यानच्या रस्त्यावर दुचाकी अपघातात 27 वर्षीय तरुण ठार झाला होता तर दोन जण जखमी झाले होते. शनिवार, 16 मार्च रोजी घडलेल्या या अपघात प्रकरणी शुक्रवारी यावल पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू
डांभूर्णी ते डोणगाव रस्त्यावर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.एक्स. 3607) द्वारे योगेश विठ्ठल कोळी (रा.डांभूर्णी) हा सागर संजय कोळी (27) व चेतन सुधाकर पाटील हे तिघे डोणगावकडून डांभूर्णीकडे जात असतांना योगेश कोळी याने रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात निष्काळजीपणाने दुचाकी चालवल्याने ती घसरली व या अपघातात सागर कोळी याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. चेतन पाटील व योगेश कोळी हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तिघांना प्रकाश चंदू कोळी, मीराबाई तुकाराम सपकाळे, कमलाकर भिका कोळी व नागरिकांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले. मयत सागर कोळी या तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबास सोपवण्यात आला. याप्रकरणी शुक्रवारी यावल पोलिसात विनोद एकनाथ कोळी यांच्या फिर्यादीवरून मोटरसायकल चालक योगेश विठ्ठल कोळी याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !