साकळीतील 19 वर्षीय विवाहितेचा पाच लाखासाठी छळ
यावल : यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या एका 19 वर्षीय विवाहितेचा पतीसह सहा जणांनी प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने छळ केला व लग्नामध्ये मानपान न केल्याने सतत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला व विवाहितेने पैसे न आणल्याने तिला माहेरी सोडून दिले. याप्रकरणी विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
असे आहे छळ प्रकरण
साकळी येथील माहेर असलेल्या सानिया मिर्झा इमरान शेख (19) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह 8 मे 2022 रोजी शेख इमरान शेख इरफान (नशिराबाद) याच्यासोबत झाला. विवाहानंतर पती शेख इमरान, सासरे शेख इरफान शेख उमर, सासू हसीनाबी शेख इरफान, ननंद मुस्कान शेख इरफान, मोठी सासू हुसना बी शेख हारून व रईसाबी शेख मोसिन या सहा जणांनी तिचा माहेरून प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून छळ केला व लग्नामध्ये मानपान न दिल्याचे सांगत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला व माहेरी सोडून दिले. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

