शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : पावणेतीन लाखांचा बिअर साठा जप्त


Big operation of Shirpur police: Beer stock worth 3 lakhs seized शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पिकअप वाहनातून पावणेतीन लाखांचा अवैध बिअरचा साठा जप्त केला आहे. पोलीस पाठलाग करीत असताना संशयीत मात्र वाहन सोडून पसार झाला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या पाठलागानंतर चालक पसार
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांना शनिवार, 30 मार्च इंदौरकडून धुळे शहराकडे जाणार्‍या पिकअप वाहन (एम.एच.04 के.यू.6645) मधून कांद्यांच्या गोण्याआड बिअरची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. गोपनीय माहितीनंतर शिरपूर टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाहन येताच त्याला थांबवण्याचा इशारा करण्यात आला मात्र चालकाने वेगाने पिकअप पळवली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केल्यानंतर तापी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर पिकअपचे टायर फुटल्याने चालकाने वाहन कच्च्या रस्त्यावर उतरवले मात्र मातीत ते फसताच चालक पसार झाला.

कांद्याच्या गोण्याआड बिअरची वाहतूक
पोलिसांनी पिकअपची पाहणी केल्यानंतर कांद्यांच्या गोण्यांच्या आडोशाला बिअरचा साठा आढळला. शंभर खोक्यांमधून दोन लाख 88 हजार रुपये किंमतीची माउंटस 6000 ही बिअर जप्त करण्यात आली तर पाच लाख रुपये किंमतीचे वाहनही ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, विनोद आखडमल, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, भदू साळुंके, सचिन वाघ, योगेश दाभाडे, आरीफ तडवी, विजय पाटील, होमगार्ड शरद पारधी, मिथून पवार आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.