राम जन्मला गं सखे राम जन्मला….!

भुसावळ विभागात श्रीरामनवमी उत्साहात : मिरवणुकांनी वेधले लक्ष

0

भुसावळ : भुसावळ शहर व परिसरात श्रीरामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राम मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनार्थ गर्दी झाली होती तर विविध धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुंकांमध्ये सजीव देखाव्यांनी लक्ष वेधले.

भुसावळात भाविकांची मांदियाळी
शहरातील सराफ बाजारातील चौकांच्या श्रीराम मंदिरात आतून रोषणाई करण्यात आली. मंदिराला आतून रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तीचा गाभारा सुध्दा फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आला. सकाळी 9.30 पासूनच मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. दुपारी 11.50 वाजता शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांची फुल्ल गर्दी झाली. भाविकांना बसण्यास सुध्दा मंदिरामध्ये जागा नव्हती. अनेक भाविकांनी उभे राहूनच दर्शन घेत आरती, कीर्तनाचा लाभ घेतला. सकाळी 10 वाजता देवेद्र मधुसुदन जोशी यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले. 12 वाजता जन्मोत्सव झाला. यावेळी तबल्यावर तेजस बालाजीवाले, हार्मोनियमवर शंभु गोडबोले यांनी साद दिली तर संदीप जोशी यांनी अभंग सादर केले. सुधीर गोरे यांनी जन्मोत्सवाच्या वेळी शंखनाद केला होता.

नेत्रदीपक मूर्तीचे झाले दर्शन
भुसावळ शहरातील सराफ बाजारातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे फोटो काढण्यात आले. मंदिर फुलांनी, रोषणाईने सजविले आहे. श्रीराम जन्म झाल्यावर मूर्ती असलेल्या गाभाण्याचा पदडा उघडल्यानंतर नेत्रदीपक भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तीच दर्शन झाल्याने भाविकांनी जय श्रीरामचा जयघोष केला होता.

61 किलोच्या मोतीचूर लाडूने वेधले लक्ष
भुसावळातील श्रीराम मंदिरात श्रीराधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे गावराणी तुपात केलेला 61 किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून श्रीराम प्रभूंच्या नैवैद्यासाठी मंदिरात ठेवला होता. यावेळी लाडूला नैवैद्य दाखवून भाविकांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप करण्यात आले. शहरातील मिलन बेकरीत हा लाडू तयार केला होता. माहेश्वरी समाजातर्फे 41 किलो साबुदाण्याची खिचडी तयार करून तिचे भाविकांना वाटप करण्यात आले, असे व्यापारी राधेशाम लाहोटी यांनी सांगितले.

साऊथ इंडीयन असोशिएशनतर्फे जन्मोत्सव
भुसावळ शहरातील मुन्सीपल पार्क भागात असलेल्या साऊथ इंडीयन असोशिएशनतर्फे श्रीराम मंदिरात जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी 12 वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उन्हाचे चटके लागत असल्याने मंदिराच्या बाहेर मंडप टाकण्यात आला. यावेळी भगवान श्रीरामप्रभू यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. दर्शन घेऊन बाहेर पडणार्‍या भाविकांना प्रसादासह 250 किलो साबुदाण्याची तयार केलेली खिचडी व पन्ह वाटप करण्यात आले. मंदिरात भाविकांची मोंठ्या प्रमाणावर गर्दी होती. यावेळी मंदिरात पाळणाही बांधण्यात आला होता.

महिलांचे नृत्य ठरले लक्षवेधक
भुसावळातील मुन्सीपल पार्कमधील श्रीराम मंदिराच्या परिसरात राम नवमीनिमित्त पिंकेथॉन ग्रुपतर्फे संध्याकाळी महिलांनी भगवान श्रीराम याच्या गाण्यावर दीपनृत्य सादर केले. पिंकेथॉन ग्रुपमधील महिलांनी सादर केलेले दीपनृत्य हे येणार्‍या जाणार्‍यांचे आकर्षण ठरले. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे होते. दीप नृत्याचे नेतृत्व पिंकेथॉन ग्रुपच्या भुसावळच्या अ‍ॅबेंसेडर प्रा.माधुरी गुजर यांनी केले. यावेळी सुमारे 30 महिलांनी नृत्यात सहभाग घेतला. मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय झाले. गेल्या महिनाभरापासून महिलांनी याचा सराव केला. या कार्यक्रमासाठी सर्व समिती सभासद तसेच श्रीराम मंदिराचे अध्यक्ष यांचे सहकार्य लाभले.

साईबाबा मंदिराजवळून पालखी
भुसावळात श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर श्री साईबाबा मंदिर व साईबाबा ग्रुपतर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरापासून पालखीला सुरूवात झाली. पालखीच्या अग्रभागी आळंदी येथील 100 टाळकरी वारकरी मुलांनी विठू माऊलीचा जयघोष केला. ही पालखी मंदिरापासून निघून नाहाटा चौफुलीवरून जामनेर रोडने अष्टभुजा देवी, ब्राम्हण संघ, मरीमाता मंदीर, सराफ बाजारातील श्रीराम मंदीर, तेथून बाजारपेठ पोलीस ठाणे, पांडुरंग टॉकीजवरून जामनेर रोडने पुन्हा साईबाबा मंदिरात पालखी आल्यानंतर समारोप झाला. पालखीचे नेतृत्व साई भक्त निर्मल कोठारी यांनी केले. यंदाच्या वर्षाच्या पालखीचे आकर्षण हे टाळकरी मुले होते.

यावलला मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी साजरी
यावल :
बुधवारी श्री राम, जय राम!, जय जय राम,!! अशा स्वरांनी व्यास नगरी दुमदुमली होती. शहरातील सातोद रस्त्यावरील पेठेच्या श्रीराम मंदिर, महर्षी व्यास मंदिरावरील श्री राम मंदिर व कोहळेश्वर श्रीराम मंदिरात जन्मोत्सवानिमित्त पुजारी मंडळीच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पध्दतीनेे पूजा झाली. पंजेरीचा प्रसाद वितरण करण्यात आला. सकाळपासून सर्व मंदिरात भाविक, भक्तांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला व दर्शना करीता दिवसभर ये-जा सुरू होती.

श्री शनी मंदिरात कीर्तन
यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्री शनी मंदिरातील पेठचे श्रीराम मंदिरात सकाळपासून श्रीराम नामाच्या किर्तनाने लक्ष वेधले. पारंपरिक पध्दतीने येथे रामदेव बाबा भजनी मंडळ, काळभैरव भजनी मंडळ, भोलेबाबा भजनी मंडळचे रूपचंदजी घारू, कमलाकर घारू, हेमराज घारूसह आदींनी प्रभू श्रीरामावर आधारीत भजन सादर केले. दुपारी 12 वाजता मंदिराचे पूजारी पप्पू महाराज जोशी यांच्या हस्ते मंदिरात शास्त्रोक्त पध्दतीने पूजा करून आरती झाली. पंजेरीचा प्रसाद भाविक, भक्तांमध्ये वितरण करण्यात आला. यावल शहरातील वाणी गल्लीतील श्री कोहळेश्वर श्रीराम मंदिरात सकाळी साडेपाच वाजता पुरोहित सारंग महाराज बाविसे व अतुल महाराज बाविसे यांच्याहस्ते विधीवत पूजा व दिलीप प्रकाश गडे व हेमलता गडे यांच्याहस्ते महा अभिषेक करण्यात आला.दहा वाजता प्रवचनाला सुरुवात झाली. कांचन संजय पाठक यांनी प्रवचन केले. दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा झाला. आरतीचा मान डॉ.निलेश गडे, सविता गडे व सिद्धेश गडे यांना देण्यात आला व मोठ्या उत्साहात मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

श्री महर्षी व्यास मंदिर, यावल
यावल : श्री महर्षी व्यास मंदिरातील श्रीराम मंदिरातदेखील श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे बिल्लू महाराज, भुवन महाराज यांनी श्रीरामांचे पूजन करून आरती केली. या कार्यक्रमाला व्यासमंदिराचे सर्व संचयालक मंडळ यात काशीनाथ बारी, अशोक बारी, गुरव अप्पा व व्यासनगरीतील अनेक भाविक हजर होते. श्रीराम जन्मानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

श्री क्षेत्र मनुदेवी
यावल :
यावल तालुक्यातील आडगाव जवळील सातपुड्यातील श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात बुधवारी नवमीनिमित्ताने नववी माळ व श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मंदिरात आरती व प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवमी निमित्ताने मंदिरात दर्शनार्थ महिलावर्गाची प्रचंड गर्दी होती. आडगाव, ता.यावल येथून सातपुड्याच्या सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे. या मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. बुधवारी नवमीनिमित्ताने नववी माळ साजरी करण्यात आली. सकाळी मंदिरात आई मनुदेवीच्या आरतीचा मान जळगाव येथील सोनवणे परिवारातील डॉ.अश्विन सोनवणे, अमित सोनवणे, शैलेश सोनवणे यांना देण्यात आला. सोनवणे कुटूंबाकडून आरती तसेच महापूजा करण्यात आली व त्यानंतर श्रीराम नवमीनिमित्त मंदिरात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करीत आरती पार पडली. नवमी असल्याने मंदिरात सकाळपासूनचं महिला वर्गाने दर्शनार्थ गर्दी केली. मंदिरात श्रीरामनवमी कार्यक्रम मंदिर परिसरातील दुकानदारांनी आयोजित केला होता व मोठ्या उत्साहात येथे नवमी व श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाकरीता संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, नितीन भास्कर पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी.चौधरी, सतीष पाटील, महेंद्र पाटील, विश्वदीप पाटील सह आदींनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.