यावल शहरात बी.एल.ओ.द्वारे वोटर स्लीपचे वितरण सुरू

0

यावल : शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून वोटर चिठ्ठीचे वितरण घरोघरी जाऊन केले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढली असतानादेखील शहरात व विस्तारित भागात सध्या प्रत्येक मतदारांपर्यंत वोटर चिठ्ठी पोहोचवण्याचे काम बीएलओ करीत आहे व त्यांना काही स्थानिक संस्था व तरुणांची मदत देखील मिळत आहे. एकूणच 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होत असून यात मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे या उद्देशातून प्रशासनाकडून लगबग सुरू झाली आहे.

मतदान टक्केवारी वाढण्यावर भर
यावल शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक तहसीलदार रशीद तडवी, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या माध्यमातून शहरात प्रत्येक मतदारांपर्यंत वोटर चिठ्ठी वितरणच्या कामाला सुरुवात करण्यात आली. बुधवारी यावल शहरातील विस्तारित भागासह मुख्य शहरात विविध प्रभागात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारांचा शोध घेऊन घरोघरी जाऊन वोटर चिठ्ठी वाटप करत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृती, त्याचप्रमाणे मतदारांपर्यंत वोटर चिट्ठी पोहोचवून त्यांनी लोकशाहीच्या या महामेळाव्यात आपले मत देऊन लोकशाही बळकट करावी, असे आवाहन देखील केले जात आहे. यावल शहरात विस्तारित भागात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरुषोत्तम साठे, मोहम्मद अझहर सिद्दीकी, शेख फारूक, शेख उस्मान, सकलेन शेख काम करतांना दिसत आहे. विस्तारीत भागात रहेनुमा स्पोर्ट्स सोसायटी यांच्या मदतीने मतदारांचा घरोघरी जाऊन त्यांचा शोध घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत वोटर चिठ्ठी वितरण केली जात आहे. निवडणुकीच्या पूर्वीच प्रत्येक मतदारांपर्यंत वोटर चिठ्ठी पोहोचवण्याचे कार्य लगबगीने केले जात आहे.

सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणार मतदान चिठ्ठी
यावल तालुक्याचे रावेर विधानसभा व चोपडा विधानसभा मतदार संघात विभाजन झाले. यात या दोन्ही विधानसभा मतदारसंघात यावल तालुक्यात एकूण 211 मतदान केंद्र आहेत. या केंद्रात एकूण दोन लाख 10 हजार 556 मतदार आहेत. 211 बीएलओंच्या माध्यमातून 13 मे पुर्वीचं मतदान चिठ्ठी पोहोचले, असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले.


कॉपी करू नका.