पाचोरा तालुक्यात वयोवृद्ध आजीचा नातवानेच केला खून : गुन्हे शाखेकडून चार तासात गुन्ह्याची उकल
जळगाव : डोक्यावर झालेले कर्ज कमी करण्यासाठी आजीचा नातवाने खून केला. ही घटना पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा येथे घडली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात या गुन्ह्याची उकल केली. मांजाबाई दगडू भोई (80, पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) असे मयताचे तर विशाल प्रभाकर भोई असे आरोपी नातवाचे नाव आहे. विशाल हा मयत मांजाबाईच्या बहिणीचा नातू आहे.
कर्जासाठी केला आजीचा खून
डोक्यावर झालेले कर्ज कमी करण्यासाठी आपण आजीचा गळा दाबून खून केल्याचे संशयित आरोपी विशाल भोई याने पोलिसांजवळ कबुल केले आहे. आजीच्या हत्येनंतर तिच्या हातातील चांदीच्या गोटपाटल्यापैकी एक गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घरात असलेल्या पोत्यामध्ये त्याने मृतदेह भरुन ठेवला. त्यानंतर मागच्या दरवाज्याने बाहेर निघून मोटार सायकलने अजिंठा गाठले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
अजिंठा येथील एका सराफी दुकानात त्याने त्या वस्तू विकून रक्कम मिळवल्याची कबुली विशाल भोई याने पोलिसांना दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत हा प्रकार उघड झाला. विशाल यास पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएएआय विजयसिंग पाटील, हवालदार लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हवालदार रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, दीपक अहिरे आदींनी ही कारवाई केली.