जळगावातील केमिकल कंपनीत स्फोट : कामगाराचा मृत्यू : मृतांची संख्या पोहोचली सहावर

0

Explosion in a chemical company in Jalgaon: Worker killed : Death toll reaches six जळगाव : जळगाव एमआयडीसीतील मोरया केमिकल कंपनीत स्फोट होवून आग लागल्यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या कामगार चंद्रकांत लक्ष्मण पाटील (27, रा.किरवाडा, पो.साकळी बोराडी, जि.धुळे) या कामगाराचा बुधवार, 1 रोजी सकाळी 11.42 वाजता मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेत मृत कामगारांची संख्या सहा झाली आहे.

22 कामगार जखमी
एमआयडीसीतील डी.सेक्टरमध्ये मोरया केमिकल कंपनीत सुगंधीत पदार्थ करण्यासाठी प्रक्रिया केली जात होती. 17 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कामावर कामगार हजर झाले. सकाळी नऊ वाजता कंपनीत स्फोट होवून या कंपनीला भीषण आग लागली. या आगीत 22 कामगार जखमी झाले तर गंभीररित्या जखमी झालेले समाधान नारायण पाटील, रामदास घाणेकर, किशोर चौधरी, दीपक सुवा तसेच सचिन चौधरी यांचा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

खाजगी रुग्णालयात मृत्यू
जखमी चंद्रकांत पाटील यांच्यावर मेहरुण परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती ठिक होवून ते घरी लवकर परततील, असा विश्वास कुटुंबातील सदस्यांचा वाढत होता. दरम्यान बुधवार, 1 रोजी चंद्रकांत पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांच्यावर तत्काळ डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर सकाळी 11.42 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळताच कुटुंबियांनी शोक केला. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.


कॉपी करू नका.