रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंगजवळ कत्तलीपूर्वीच 32 गुरांची सुटका : चालक वाहन सोडून पसार

0

Rescue of 32 cattle near Sahastraling in Raver Taluka before Slaughter : driver abandons vehicle and runs away रावेर : गुरांची निर्दयतेने विना परवाना वाहतूक करणारा ट्रक मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील शेरी नाक्यावरील बॅरीकेटस तोडून पसार होण्याच्या प्रयत्नात सहस्रलिंग गावाजवळ सिनेस्टाईल पकडण्यात आला मात्र चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनातील 32 गुरांची कत्तलीपूर्वीच मुक्तता केली आहे. याप्रकरणी चालकाविरूध्द रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरांची वाहतूक ऐरणीवर
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने मध्यप्रदेश महाराष्ट्राच्च्या सीमेवरील शेरीनाका येथे तपासणी नाका सुरू करण्यात आला आहे. गुरांची निर्दयतेने विना परवाना वाहतूक करणार्‍या ट्रक (क्रमांक एम.पी.37 जी.ए. 3342) हा महाराष्ट्रातील शेरीनाका येथील तपासणी नाक्यावरील बॅरीकेट तोडून भरधाव वेगाने पालकडे आला. या ट्रकने पाल गावातील एका व्हिस्टा गाडीला कट मारुन या गाडीचे नुकसानही केले. पाठलाग करत पोलिसांनी हा ट्रक सहस्रलिंग गावाजवळ पकडला. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्यात 37 गोर्‍हे वैद्यकीय परवाना नसताना वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले तर निर्दयतेने झालेल्या वाहतुकीमुळे पाच गुरांचा मृत्यूही ओढवला.

पोलिसांनी गुरांची मुक्तता करून त्यांची जळगावच्या आर.सी.बाफना गो शाळेत रवानगी केली. कॉन्स्टेबल दीपक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरूध्द भादंवि 429, 279, 427 व प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नवले पुढील तपास करीत आहेत.


कॉपी करू नका.