54 हजारांचे लाच प्रकरण : पिंपळनेर महिला बालविकास प्रकल्प अधिकार्याला अखेर अटक
धुळे : प्रवास भत्ता बिलाच्या एकूण दहा टक्के लाच मागून पहिल्या हप्त्यापोटी 54 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपळनेरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे (39) यांच्याविरोधात मंगळवार, 7 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र कारवाईच्या धसक्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना धुळे सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले व 14 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्जार्च) मिळताच त्यांना धुळे एसीबीने अटक केली. 15 मे रोजी बनसोडे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सुरूवातीला एक दिवस व नंतर पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. शनिवार, 18 रोजी कोठडी संपल्यानंतर बनसोडे यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणात तक्रारदार या अधिनस्त पर्यवेक्षिका आहेत. संशयीत आरोपी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या कार्यालयातील सहकारी कर्मचार्यांचे प्रवास भत्त्याची देयके संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याच्या मोबदल्यात अदा रकमेच्या 10 टक्के लाच मागितली. प्रवास भत्त्यापोटी मंजूर रुपये नऊ लाख 37 हजार 533 रुपये रक्कमेच्या 10 टक्के रक्कम रुपये 93 हजार रुपये लाच 6 मे रोजी मागण्यात आल्यानंतर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली व सापळा रचण्यात आला. लाच रकमेपैकी पहिला हप्ता रुपये 54 हजार रुपये मंगळवारी स्वीकारताना शुभांगी बनसोडे यांना मंगळवार, 7 मे रोजी ताब्यात घेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती खालावताच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

14 रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी मिळताच धुळे एसीबीने अटक केली व न्यायालयाने सुरूवातीला एक दिवस व नंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी कोठडीची मुदत संपताच बनसोडे यांना पुन्हा न्यायालयात हजर केेले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. बनसोडे यांची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी तथा पोलीस अधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली.