भडगाव तालुक्यात उसनवार पैशांच्या वादातून वृद्धाचा चॉपरने खून : आरोपी जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पाच तासात केली खुनाच्या गुन्ह्याची उकल

0

जळगाव : उसनवारीच्या पैशाच्या वादातून भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत 8 मे रोजी सकाळी 65 वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आाल. जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच तासात जलद तपास करीत एका 21 वर्षीय तरुणाला अटक केली. सूपडु नाना वेलसे (65, रा.पेठ भाग, भडगाव) असे खून झालेल्या वयोवृद्धाचे तर कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे (21, रा.पेठ भाग, भडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पाच तास गुन्ह्याची उकल
वेलसे यांचा मृतदेह भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावामधील दगडाचे खदानीत 8 मे रोजी सकाळी आढळला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, एएसआय विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत मयताची ओळख पटविली. मयत सुपडू वेलसे हा संशयित आरोपी कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे (21, रा. पेठ भाग, भडगाव) याच्यासोबत गेल्याचे कळाल्यानंतर कुणाल मराठे याला ताब्यात घेण्यात आले व त्याने चौकशीत गुन्हा कबूल केला.

उधारीच्या पैशांचा वाद
सुपडु वेलसे याचे कडून उसनवारीवर कुणाल मराठे याने पैसे घेतले होते. काही पैसे कुणाल मराठे याने वेलसे याला परत केले परंतु तो वारंवार कुणालकडे पैसे मागुन तगादा लावत होता तसेच वारंवार कुणाल मराठे याचे घरी येवून त्याला व घरच्या लोकांना गल्लीत मोठ-मोठ्याने अश्लील शिवीगाळ करीत होता. त्यामुळे कुणालच्या घरची मंडळी, आई व वडील हे घर सोडून निघून गेले होते त्यामुळे कुणालला सुपडू वेलसे याच्यावर राग होता. सुपडु वेलसे यास 7 मे रोजी तुझे उधारीचे पैसे द्यायचे आहे, असे सांगुन कुणालने एरंडोल रस्त्याला बोलावून ‘पिंपरखेडला एक जण पैसे देणार आहे, त्याचे कडून घेवून तुला देतो’ असे सांगुन वेलसे यास मोटार सायकलवर बसवून घेऊन गेला. सुपडू वेलसे यांना वरखेड गावाचे पुढे पिंपरखेड गावाचे दिशेने कुणाल मराठे याने घेवून जावून उजव्या बाजुस असलेल्या दगडाच्या खदानीत नेत चॉपरने जीवे ठार मारले.


कॉपी करू नका.