फैजपूर शहरात घराला आग ; 13 लाखांचे नुकसान
House fire in Faizpur city ; 13 lakhs loss फैजपूर : फैजपूर शहरातील तडवी वाड्याजवळील धोबी गल्लीत धोबी कुटुंबीयांच्या घराला शुक्रवार, 17 मे रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास आग लागली. यात जीवितहानी झाली नाही मात्र घरातील संसारोयोगी वस्तूंसह ग्राहकांचे कपडे जळाल्याने सुमारे 13 लाखांवर नुकसान झाले.
मध्यरात्री लागली आग
प्रभाग एकमधील धोबी गल्लीतील घरात गोकुळ बंपालाल धोबी (सोनवणे) व त्यांची पत्नी दोघे रात्री झोपले असताना अचानक शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची चाहूल लागल्यानंतर त्यांनी जीव मुठीत धरून घरातून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. काही वेळात फैजपूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझविली. आगीत गोकुळ धोबी यांचे घराचे मीटर, इलेक्ट्रिक बोर्ड, टीव्ही, पंखा व संसारोपयोगी वस्तू व त्यांच्याकडे लाँड्रीसाठी ग्राहकांचे असलेले जवळपास दीड हजार कपडे आणि 30 साड्या जळून खाक झाल्या. आग इतकी मोठी की सलग तीन तास अग्निशमन विभागाची गाडी व सर्व परिसरातील लोक आग विझवण्यासाठी मेहनत घेत होते. आगीची माहिती मिळताच आमदार शिरीष चौधरी यांनी भेट देऊन पाहणी केली.

भरपाई मिळण्याची अपेक्षा
रात्री वादळामुळे खांबावरून आलेल्या सर्व्हिस वायरमध्ये आग लागली. त्यातून मीटरमध्ये आग पोहोचली. गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तलाठी तेजस पाटील यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. सावदा विभाग महावितरण कंपनीचे वरीष्ठ इंजि.गौरक्षनाथ सपकाळे, माजी नगरसेवक कितन किरंगे, काँगे्रसचे शहराध्यक्ष शेख उपस्थित होते. आगीची माहिती मिळताच फैजपूरचे पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, हवालदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिवसेना (उबाठा) पक्षाचे युवा शहरप्रमुख भास्कर सोनवणे, मानवाधिकार संघटना शहराध्यक्ष डॉ.दानिश शेख, शेख एजाज यांच्यासह सामाजिक ज राजकीय कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. तलाठी तेजस पाटील यांनी आगीचा पंचनामा करून यावल तहसीलदारांकडे पाठविला आहे. आगीत 13 लाखांचे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले.