वाघाच्या कातडीची तस्करी : मुक्ताईनगर तालुक्यातील टोळीसह सहा अटकेत
Tiger skin smuggling : Six arrested along with a gang in Muktainagar taluka जळगाव : दुर्मीळ असलेल्या वाघाच्या कातडीची शिकार करून तिची तस्करी करणार्या मुक्ताईनगर तालुक्यातील टोळीला वनविभागाने अटक केली आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील टोल नाक्यावर शुक्रवार, 26 जुलै रोजी सकाळी आठ वाजताही कारवाई करण्यात आली तर जळगाव वनखात्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नशिराबाद टोल नाका येथे वाघांच्या कातडीसह एक टोळी आल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. यानुसार, शुक्रवार, 26 जुलै रोजी सकाळी 8 वाजता सापळा लावला असता दोन मोटारसायकलींवरून एकूण सहा संशयीत जात असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यांची झडती घेतली सता त्यांच्या कडून वाघाची कातडी जप्त करण्यात आली. या वाघाची शिकार कुणी व कशी केली याबाबत वनविभागाकडून माहिती घेतली जात आहे.

या आरोपींना अटक
दरम्यान, वन खात्याच्या अंतर्गत असलेल्या कस्टम विभागाने या संदर्भात सहा जणांना अटक केली. या आरोपींमध्ये अजवर सुजात भोसले (35, रा.हलखेडा, ता.मुक्ताईनगर), नदीम गयासोद्दीन शेख (26, अहमदगनर) कंगनाबाई अजवर भोसले (30, रा.हलखेडा, ता.मुक्ताईनगर), रहिम रफीक पवार (रा.हलखेडा, ता.मुक्ताईनगर), तेवाबाई रहिम पवार (रा.हलखेडा, ता. मुक्ताईनगर), मोहंमद अतहर खान ( वय 58, रा भोपाळ, मध्यप्रदेश) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पुणे विभागाचे कस्टम अधिकारी रवी रंजन, जळगावचे कस्टम अधिकारी श्याम कोठावळे, वनसंरक्षक धुळे येथील निनु सोमराज, वनसंरक्षक ए.प्रवीण, विभागीय वन अधिकारी आर.आर.सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली यु.एम.बिराजदार, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांनी केली आहे.
