ग्रामीण भागाची जीवनवाहिनी थांबली : प्रवाशांचे अतोनात हाल
खाजगी वाहतुकीचा प्रवाशांना आधार : रेल्वेलाही वाढली गर्दी
भुसावळ (4 सप्टेंबर 2024) : एस.टी.च्या खासगीकरणाला विरोध करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध संघटनांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एस.टी. न धावल्याने शहरी व ग्रामीण भागातील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. भुसावळ आगारातील 95 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले तर यावलसह बोदवड, रावेर, मुक्ताईनगरातही कर्मचार्यांनी संपात सहभाग नोंदवला.
अवैध वाहतुकीला आला ऊत
मंगळवारी एस.टी.कर्मचार्यांनी संपाची हाक देताच एस.टी.चे चाक थांबले मात्र अचानक जाहीर झालेल्या संपामुळे ग्रामीण भागातून शहरावर आलेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला तर भुसावळ शहरातून बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची त्रेधा-तिरपीट उडाली. अनेकांनी नियोजित प्रवास रद्द केला तर काहींनी खाजगी अवैध वाहतुकीचा सहारा घेतला तर काहींनी रेल्वेने प्रवास केला.
भुसावळात 95 टक्के कर्मचारी संपात सहभागी
संपामुळे भुसावळ आगाराच्या 260 फेर्या रद्द झाल्याने आगाराला पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागले. 95 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी महामंडळ कर्मचार्यांचा संपामुळे बसस्थानकात गर्दी ओसरली होती तर संपामुळे महामंडळाची एकही बस बाहेर पडली नाही. सर्व वाहक, चालक, मॅकेनिकल हे आगारात थांबून होते, तर चालक, वाहकांचे विश्रामालय हे कर्मचारी नसल्याने ओस पडले होते. पालघरहून मुक्कामी आलेली बस संपामुळे भुसावळ आगारात थांबून होती, असे आगार प्रमुख राकेश शिवदे म्हणाले. भुसावळ आगारातील 91 चालक, 87 वाहक, 58 मॅकेनिकल, 22 लिपिक संपात सहभागी झाले.
या मागण्यांसाठी संपाची हाक
एस.टी.कर्मचार्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ द्यावी, राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे एस.टी.कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा आदी मागण्यांसाठी एस.टी.कामगार कृती समितीने संपाची हाक दिली आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कृती समितीची बैठक 7 ऑगस्टला झाली व 20 ऑगस्टला अंतीम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतरही तोडगा निघाला नसल्याने संपाची हाक देण्यात आली.
मुक्ताईनगरातही प्रवाशांचे हाल
एस.टी.च्या संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले तर आगाराला मात्र लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. याप्रसंगी कामगार संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष जगदीश गायकवाड, सचिव नरेंद्र देशमुख, विभागीय सहसचिव प्रमोद धायडे, दीपक नाफडे, सोपान विचवे, रशीद तडवी, ए.व्ही.काटे, एस.पी.नायसे, डी.डी.धोबी, एस.पी.पाटील, एच.जे.पाटील, आदिनाथ सालेघाय, कृष्णा काळे, बी.डी.धुंदे यांच्यासह असंख्य कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.