गुन्हेगारांच्या बेकायदा घरावर बुलडोझर फिरवणार ! : पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

0

पुणे (6 सप्टेंबर 2024)  : पुण्यात आता योगी पॅटर्न चालणार असून गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर फिरवला जाणार आहे. नियमांच्या चौकटीत राहून हे काम करण्यात येणार आहे. तुम्ही बदमाश असाल तर पोलीसदेखील कायद्याच्या चौकटीत राहून हे काम करून दाखवतील, असा इशाराच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.

गुन्हेगारीचा बिमोड करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनामागे
कौटुंबिक मालमत्तेचा वाद हे एक कारण असले तरी, टोळीयुद्धाच्या संघर्षाची मोठी किनार या प्रकरणाला आहे. निखिल आखाडे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीने वनराज यांचा काटा काढला. वनराजच्या खुनात सहभागी असलेल्या प्रमुख आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी या गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या बेकायदा घरावर बुलडोझर फिरविण्याची तयारी केली आहे.

पोलिसांकडून काढली जातेय माहिती
पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या बेकायदा घरांची, मालमत्तेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही आरोपी फ्लॅटमध्ये राहत आहेत, तर काही आरोपींची घरे भाड्याची आहेत. त्यांची घरे तपासली जात आहेत. त्यामध्ये जर ही घरे सरकारी जागेत अतिक्रमण करून उभारली असतील, कोणाच्या मालमत्तेत अवैध ताबा मारून बांधली असती तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आणखी काही संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना लवकरच पोलिस अटक करतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.


कॉपी करू नका.