भुसावळ शहरात 27 रोजी भूलाबाई महोत्सव
केशवस्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजन
भुसावळ (16 सप्टेंबर 2024) : आमदार संजय सावकारे प्रायोजित व केशवस्मृती प्रतिष्ठान व शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित ‘भुलाबाई महोत्सव’ शहरातील संतोषी माता सभागृहात शुक्रवार, 27 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. बदलत्या आधुनिक काळात लोक परंपरांची व संस्कृतीची ओळख करून देवून महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन वयोगटात स्पर्धेत प्रवेश
तीन वयोगटात स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. त्यात लहान गटात पाच ते दहा तर मोठ्या गटात 11 ते 16 व खुल्या गटात 17 वर्षांपासून पुढे प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक संघाला पाच मिनिटांचा कालावधी सादरीकरणासाठी मिळेल व बेल वाजवून कालावधी संपल्याचे सूचित केले जाईल. सीडी वा पेन ड्राईव्हवरील गाणी चालणार नाही त्यासाठी गाणी तोंडी म्हणणे आवश्यक आहे. प्रत्येक संघात 12 ते 15 जणांचा (गायक व वादकासह) सहभाग अपेक्षित तसेच स्पर्धेत गीत, नृत्य, वेषभूषा, सांघिकता, सामाजिक संदेश यावर गुण देण्यात येतील व खुल्या गटातच केवळ कानबाई, नागपंचमी, श्रावण सोमवार, गौरी गणपती आदी गाण्यांना प्राधान्य असेल.

सहभागासाठी संपर्काचे आवाहन
सहभागासाठी अनिता आंबेकर (7304434349), सोनल महाजन (9130838468), जयश्री चौधरी (9158823288), वैशाली सैतवाल (9511886655), राजश्री बादशाह (8600783976), दीपक पाटील (जोगलखेडा, मो.9511886655) वर संपर्क साधावा तसेच निशुल्क सहभाग असून 24 पर्यंत नाव नोंदणी करता येईल, असे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी कळवले आहे.
