विसर्जन मिरवणुकीत 44 पैकी पाच मोठ्या 20 फुटापेक्षा उंच मूर्तींच्या मंडळांना प्रवेश नाही

पोलीस निरीक्षक राहुल वाघ : बाजारपेठ पोलीस ठाण्यात बैठक


भुसावळ (10 सप्टेंबर 2024) : शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी 44 गणेश मंडळांचा समावेश असतो मात्र यंदा पोलिसांनी शहरातील पाच गणेश मंडळांच्या मूर्ती 20 फुटापेक्षा उंच असल्याने अश्या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होवू नये, अशा सूचना बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केल्या. बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी 12 वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

पदाधिकार्‍यांना केल्या सूचना
निरीक्षक राहुल वाघ यांनी मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत केले. गणेश मंडळाच्या अध्यक्षांच्या सूचना त्यांनी ऐकून घेतल्या. अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी हे रस्त्यात उभे राहून मागील मंडळाला पुढे जाऊ देत नाही, पालिकेतर्फे गारखेडा येथे क्रेनची व्यवस्था करण्यात यावी, जेणे करून मोठ्या मूर्ती या क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यास सुलभ होऊ शकते. शहरातील रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावी, वीजपुरवठा खंडीत होऊ देऊ नये, लोंबकळणार्‍या तारा उंच कराव्यात, तापी नदीवर जास्त लाईट लावण्यात यावे आदी सूचना मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केल्या. यावेळी गोपनीय विभागाचे नितीन सपकाळे, भाऊसाहेब पाटील, हेमंत जांगडे यांनी सहकार्य केले.

केमिकलयुक्त गुलाल उधळू नका
विसर्जन मिरवणुकीत केमिकलयुक्त गुलाल उधळू नका, केमिकल युक्त गुलाल उधळण्यात प्रतिबंध केला आहे. अश्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहे. प्रतिबंधीत केलेला गुलाल उधळल्यास संबंधित मंडळावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. यासाठी विशेष पथक पोलिसांनी तयार केल्याचे निरीक्षक राहुल वाघ म्हणाले.

मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई करणार
मुख्य मिरवणूकीत विनाकारण डीजे व वाहन रेंगाळणार्‍या मंडळांना तत्काळ मिरवणूकीतून बाजूला काढण्यात येईल व सर्वांत शेवटी मंडळास मिरवणुकीच्या मागे सोडण्यात येईल, मुख्य मिरवणकीतील श्री गणेश मंडळ हेच मिरवणूकीत सहभागी होतील, त्याच्या व्यक्तीरिक्त त्यांच्या नावावर दुसरे मंडळ सहभागी करता येणार नाही, तसे आढळल्यास मंडळाची परवानगी रद्द करण्यात येईल, असे निरीक्षक वाघ म्हणाले. शहरातील नृसिंह मंदिराजवळ मंडळांनी तीन वाजेला रांगेत लागावे. शहरातील जामनेर रोडवरील मोटुमल शोभराज चौक, वाल्मीक चौक येथून फक्त प्रत्येकी लाईनप्रमाणे एक मंडळ यांनाच आत प्रवेश दिला जाईल तसेच जी मंडळे पोलिसांच्या सूचनांचे पालन करणार नाही अश्या मंडळा कारवाई केली जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !