जळगावात बसमध्ये चढताना महिलेचे 21 हजार लांबवले
जळगाव : एस.टी.बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील 21 हजाराची रोकड चोरट्याने लांबविली. ही घटना सोमवार, 28 रोजी सकाळी 10.30 वाजता नवीन बसस्थानकात घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सोमवार,30 रोजी गुन्हा दाखल झाला.
असे आहे प्रकरण
मनिषा दिनेश पाटील (35, रा.वाघनगर) ही महिला गावी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात एसटी बसच्या प्रतीक्षेत थांबून होत्या. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अमळनेर-शिंदखेडा बस (क्रमांक एम.एच.14 बी.टी.1351) आवारात लागल्यानंतर बसमध्ये महिला चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पर्स उघडून त्यातील 21 हजार रुपयांची रोकड लांबवली.

हा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली मात्र तोवर चोरटा पसार झाला. त्यांनी माहिती तत्काळ वाहक व चालकाला दिली. ही खबर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी बसस्थानकात येऊन माहिती घेतली तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याकामी सुचना केल्या. तपास हवालदार रवींद्र ठाकरे हे करीत आहेत.
सतर्कता आवश्यक
प्रवास करताना महिलांनी सोबत दागिने बाळगू नये तसेच पर्समधील पैश्यांची काळजी घ्यावी. गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांचे दागिने रोकड, पर्स, मोबाईल चोरुन नेतात. प्रवाश्यांनी नेहमी सतर्कता घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
