हवेत गोळीबार करून दहशत : वाळूमाफिया जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव (09 ऑक्टोबर 2024) : गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालाने फोटो काढले होते. त्यावर तेथील वाळू माफियाने हवेत गोळीबार करून दहशत पसरवली होती. ही घटना चांदसर, ता.धरणगाव येथे मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सुमारास घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गोळीबार करणार्या निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे (कोळी, 32, रा.वाकटुकी, ता.धरणगाव) यास अटक केली आहे.
असे आहे गोळीबार प्रकरण
चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत असताना तो रोखण्यासाठी गावाबाहेरून चार्या खोदून रस्ता बंद करण्यात आला मात्र अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाकटुकी येथील काहीजण चार्या बुजवत होते. याबाबत कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना कळताच त्यांनी धाव घेत जाब विचारला. याचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाल कोळी याने त्यांच्याजवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हवेत गोळीबार केल्यानंतर संशयीत पसार झाले होते.

गावठी कट्ट्यासह संशयीत जाळ्यात
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे आठवडे बाजारातून संशयीताला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील गावठी कट्टा व मॅगझीनसह 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पुढील तपासासाठी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील आदींच्या पथकाने केली.
