दोन लाखांची लाच भोवली : पारोळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांसह चौकडी एसीबीच्या जाळ्यात
वर्क ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात मागितली लाच : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ
Bribe of Rs 2 Lakhs: Parola Panchayat Samiti’s group development officers in ACB’s net पारोळा (23 ऑक्टोबर 2024) : कामांची वर्क ऑर्डर तसेच बिल काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाखांची लाच मागणी केल्याप्रकरणी पारोळा गटविकास अधिकार्यांसह पाच जणांविरोधात जळगाव एसीबीने कारवाई करीत चौघांना बेड्या ठोकल्याने पंचायत समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
पाच जणांविरोधात गुन्हा : चौकडी जाळ्यात
गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांमध्ये पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (56, मानराज पार्क, जळगाव), विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (58, रा.मुक्ताई नगर), गणेश प्रभाकर पाटील (50, रा.मानसिंगका नगर, पाचोरा), अतुल पंढरीनाथ पाटील (37 रा.मोंढाळे प्र.अ., ता.पारोळा), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) योगेश साहेबराव पाटील (37, गुलमोहर बाग, पारोळा) यांचा समावेश असून योगेश पाटील व्यतिरीक्त वरील चारही आरोपींना अटक करण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
सावखेडा तुर्क, ता.पारोळा येथील 33 वर्षीय तक्रारदाराने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावी पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे सात लाखांचे व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे 60 लाखांची तीन कामे व शासनाच्या 90-10 हेडखाली 30 लाखांची तीन अशी एकूण 90 लाखांची सहा कामे घेण्यात आली होती. त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशाचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याचे मोबदल्यात गटविकास अधिकार्यांनी दोन लाख लाच मागितली तसेच विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी फिर्यादीस दोन लाख रुपये लाच रकमेपैकी 50 टक्के प्रमाणे एक लाख रुपये लाच रक्कम अॅडजस्ट करून लाच रक्कम आरोपी गटविकास अधिकार्यांना देण्यासाठी प्रोत्साहन तसेच लाचेला समर्थन दिले तसेच अन्य तिघांनी स्वतः साठी व आरोपी गटविकास अधिकार्यांसाठी दोन टक्के प्रमाणे लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी 29 ऑगस्ट, 3 सप्टेंबर व 9 सप्टेंबर 2024 रोजी पारोळा पंचायत समिती कार्यालयात लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आल्यानंतर अहवाल येताच बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली.
यांनी केली कारवाई
आरोपींना अटकेची कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.
