जळगावात चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू..!


जळगाव (30 ऑक्टोबर 2024) : गॅलरीतून कपडे काढताना तोल गेल्यानंतर चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू ओढवला. शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा नगर भागात ही घटना मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रेरणा विजय गजरे (19, रा.मुंदडा नगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे.

कपडे काढताना गेला तोल
प्रेरणा ही आई, वडील, बहीण यांच्यासह राहत होती. यावल येथिल महाविद्यालयात पदवीच्या दुसर्‍या वर्षात शिकत होती. मंगळवारी घरी वाळलेले कपडे गॅलरीतून काढत असताना अचानक तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली. कुटुंबीय व नागरिकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.निखील तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रेरणाचे वडील विजय गजरे हे यावल येथे माजी नगरसेवक होते. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रेरणाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली.


कॉपी करू नका.