दगडी मनवेलच्या विवाहितेला शेतात सर्पदंश ; उपचारार्थ हलवताना ओढवला मृत्यू
यावल (15 नोव्हेंबर 2024) : यावल तालुक्यातील दगडी मनवेल या गावातील 30 वर्षीय विवाहिता गुरुवारी शेत शिवारात कापूस वेचणी करत असताना तिच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने तिला उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शेतात काम करताना सर्पदंश
दगडी मनवेल, ता.यावल गावातील रहिवासी नयना गणेश पाटील (30) ही महिला गुरुवारी शेत-शिवारामध्ये कापूस वेचणी करीत असताना तिच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने उपचाराकरिता यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ.शुभम, अधिपरिचारिका प्रियतमा पाटील, संजय जेधे, बापू महाजन आदींनी उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना महिलेची प्रकृती खालावल्याने तातडीने येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्याच्या सूचना करण्यात आल्या मात्र जळगाव येथे नेत असतानांच तिचा मृत्यू झाला.
दगडी मनवेल गावात हळहळ
विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गणेश रवींद्र पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे, मोहसीन खान, अलाउद्दीन तडवी करीत आहे. मयत महिलेच्या पश्चात सासू-सासरे, पती, मुलगा असा परिवार आहे. विवाहितेच्या मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात आली.