लाकडाची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या ट्रकमधून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त


रावेर (18 नोव्हेंबर 2024) : लाकडाचा अवैध वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या गस्ती पथकाने पकडून ट्रकसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैधरित्या वृक्षतोड करून बेकायदा वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

गस्ती पथकाच्या कारवाईने खळबळ
वनविभागाचे गस्ती पथक सोमवारी रावेर ते मोरगाव खुर्द रस्त्याने शासकीय वाहनाने गस्त करत असताना पथकाला मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच.04 सी.यु.5418) मध्ये अवैध लाकूड भरलेले दिसून आले. ट्रक चालकाकडे लाकूड वाहतूक परवाना न मिळाल्याने मुद्देमालासह वाहन ताब्यात घेण्यात आले. हे वाहन शासकीय मुख्य आगार डेपो, रावेर येथे जमा करण्यात आले आहे.
21 हजार रुपये किंमतीचे निम जळाऊ लाकूड व दोन लाख 30 रुपये किंमतीचा आयशर ट्रक मिळून दोन लाख 51 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल वनविभागाच्या पथकाने जप्त केला. याबाबत भारतीय वन अधिनियमान्वये शेख लुकमान शेख बशीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनरक्षक सूपडू सपकाळे, जगदीश जगदाळे, थावर्‍या बारेला, कियारसिंग बारेला, आकाश बारेला, निलेश बारेला, वाहन चालक विनोद पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !