मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


I accept whatever decision the BJP leadership takes regarding the Chief Minister’s post: Chief Minister Eknath Shinde मुंबई (27 नोव्हेंबर 2024) : राज्याच्या सीएम पदी कुणाची वर्णी लागणार ? याबाबतचा तिढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे असून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा नेतृत्व जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असे म्हटले आहे.

प्रेसमध्ये शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. काल पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.


सख्खा लाडका भाऊ ही ओळख मोठी
शिंदे म्हणाले की, निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन-तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चालले. मी 80 ते 90 सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. गेल्या अडीच वर्षांत भाजपा आणि केंद्र सरकारने खूप पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या काळात बंद झालेल्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या. लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ यांसह अनेक योजना राबवल्या. यशस्वी केल्या. सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ ही ओळख मोठी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नाराज होऊन आम्ही रडणारे नाही
मी कार्यकर्ता म्हणून काम केले. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही. तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाइड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !