विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्चाची : वाहन धारकांनी नियम पाळावे : भुसावळात सहा.निरीक्षक राहुल भंडारे
भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वाहन चालकांसाठी वाहतूक नियमांचे मार्गदर्शन
भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनाच्या चालकांनी सुरक्षेचे व वाहतुकीचे नियम पाळावेत अन्यथा कारवाई अटळ असल्याचे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक राहुल भंडारे यांनी सांगितले. शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या वाहन चालकांच्या बैठकीत ते बोलत होते.
वाहतुकीच्या दिल्या टीप्स
बैठकीत भुसावळ वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांना सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने, शाळेत धावणार्या रिक्षा, व्हॅन आणि बस चालकांना भुसावळ वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे व कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या.


रस्त्यावरील वाहतुकीचे नियम पाळणे, वाहनांची गती मर्यादित ठेवणे, आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाहनात न बसवणे याविषयी कायदेशीर व सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी स्कुलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनीही उपस्थित रिक्षा व बस चालकांशी संवाद साधला. मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी सर्वस्वी चालकांवर असते, त्यामुळे वाहन चालवताना कोणतीही घाईगडबड न करता खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिराप्रसंगी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिंसिपल निना कटलर, शिरीष झांबरे आणि मोठ्या संख्येने शालेय वाहन चालक उपस्थित होते.