पुन्हा शेअर मार्केटच्या आमिषाने फसवणूक : भुसावळातील व्यापार्याला 34 लाखांचा चुना
Again cheated with the lure of stock market : Bhusawal businessman cheated of Rs 34 lakhs भुसावळ (15 डिसेंबर 2024) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला व आवाहन केल्यानंतर नागरिक भूलथापांना बळी पडत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. भुसावळातील एका व्यापार्याला शेअर मार्केटचे अमिष दाखवत अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली 34 लाखात गंडवण्यात आले. याप्रकरणी शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
भुसावळातील शांती नगरात 50 वर्षीय व्यापारी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. 1 जानेवारी 2024 रोजी त्यांना एका व्हॉट्सअॅपवरून अनोळखी ज्योती नाव सांगणार्या एका महिलेचा फोन आला. तिने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आणि तुम्हाला अधिक नफा मिळून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 34 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी प्रशांत अग्रवाल यांनी शुक्रवार 13 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ज्योती नाव सांगणार्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.