भुसावळात आमदार संजय सावकारेंना मंत्री पद : विकासाचा अनुशेष भरुन निघणार ; रजनी सावकारे
Development backlog will be filled ; Rajani Sawkare भुसावळ (15 डिसेंबर 2024) : नागपूरात आत महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होत असून जिल्ह्यातून चौघांना मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनादेखील मंत्री पदाची संधी मिळाली असून त्याबातची माहिती भुसावळात धडकताच कार्यकर्ते सुखावले आहेत तर काही वाहनांद्वारे नागपूरकडे दुपारीच रवाना झाले आहेत. आमदारांच्या विजयात सिंहाचा वाटा असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रजनी सावकारे यांनादेखील सुखावह बातमी कळताच त्या वाहनाद्वारे मुलगी सुनिधीसह नागपूरकडे रवाना झाल्या आहेत. मंत्री पद मिळाल्यानंतर शहराचा विकासाचा अनुशेष भरून निघेल, असा आशावाद त्यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’सोबत बोलताना व्यक्त केला.
भाग्यशाली आमदारांना दुसर्यांदा मंत्री पदाची संधी
रजनी सावकारे म्हणाल्या की, भुसावळ तालुक्यातील इतिहासात सलग चारवेळा निवडून येण्याचा बहुमान व भाग्यशाली ठरलेले आमदार संजय सावकारे एकमेव आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीत असताना आमदारांना मंत्री पद मिळाले होते व आता चौथ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कामाची पावती देत मंत्री पद बहाल केल्याने आज मनस्वी आनंद होत असल्याचे आमदारांच्या सौभाग्यवती रजनी संजय सावकारे यांनी सांगितले.
हे यश कार्यकर्ता व मतदारांचेच
रजनी सावकारे विनम्रतापूर्वक म्हणाल्या की, आमदारांच्या विजयासाठी झटणार्या निष्ठावान कार्यकर्ता, पदाधिकारी तसेच त्यांना मतदान करणार्या सर्व मतदारांचे आम्ही ऋणी आहोत. मंत्री पदासाठी शहरासह तालुक्याच आता अनुशेष भरून निघेल व आगामी पाच वर्षात विकासकामे आता जलदगतीने होतील, असेही रजनी सावकारे यांनी सांगितले. भुसावळच्या इतिहासात दुसर्यांदा मंत्री पद मिळवण्याचा बहुमानही आमदारांनी मिळवला असून यापुढे विकासाचा झंजावात असाच सुरू राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.