धक्कादायक : महायुतीच्या 62 टक्के मंत्र्यांवर गुन्हे ; नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक 38 केसेस
Crimes against 62 percent of Mahayuti ministers ; Nitesh Rane has the highest number of 38 cases नागपूर (17 डिसेंबर 2024) : नागपूरात महायुतीतील मंत्र्यांचा नुकताच शपथविधी आटोपला. त्यातून अनेक आमदार नाराज असल्याचीही बातमी समोर आली तर आता महायुती सरकारमधील 42 पैकी तब्बल 26 मंत्र्यांवर (62 टक्के) गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 17 मंत्र्यांवर (40 टक्के) गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
प्रतिज्ञा पत्रातून माहिती समोर
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले त्यामधून ही माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदेवरही गुन्हे दाखल
या विश्लेषणानुसार, 26 (62 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर फौजदारी खटले जाहीर केले आहेत आणि 17 (40 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये 40, तर मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या कणकवली विधानसभेतून निवडून आलेले आमदार नितेश राणे यांच्यावर तब्बल 38 केसेस दाखल आहेत. राणे यांच्यावर महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 4, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांमध्ये सर्वाधिक 16 मंत्री हे भाजप पक्षातील आहेत. त्याखालोखाल 6 जण हे शिवसेना आणि 4 जण हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आहेत. गंभीर स्वरूपातील गुन्ह्यांमध्येही सर्वाधिक 10 मंत्री हे भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादीचे 4 व शिवसेनेच्या 3 मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल असल्याचे अहवालात म्हटले आहे.