जळगावात सीबीआयने नोंदवला निलेश भोईटेंचा जवाब

मविप्र व बीएचआर खंडणी प्रकरण : आज सुनील झंवर यांचा जवाब नोंदवण्यात येणार !


CBI records Nilesh Bhoite’s statement in Jalgaon जळगाव (17 डिसेंबर 2024) : ‘बीएचआर’ प्रकरणी दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला मदतीच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध चाळीसगाव येथे गुन्हा दाखल आहे शिवाय ‘मविप्र’ प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासासाठी सीबीआयचे दिल्लीतील पथक जळगावात दाखल झाले आहे. पहिल्या दिवशी सोमवारी मयुरेश भोईटे यांचा जबाब नोंदवण्यात आला तर मंगळवारी दिवसभरात निलेश भोईटे यांचा जवाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे आहे नेमके प्रकरण
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला मदत करण्यासाठी त्रयस्थ इसमामार्फत तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी लाच मागितली, अशी फिर्याद सूरज झंवर यांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्यासह चाळीसगावचा मद्य व्यापारी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेच्या वादप्रकरणी कट रचून संस्थेचे सचिव नीलेश भोईटे यांच्या घरात सुरा ठेवणे व इतर घडामोडींप्रकरणी 7 ऑक्टोबर 2022 जळगाव शहर पोलिसात नीलेश भोईटे यांनी तक्रार दिल्यावरूनही गुन्हा दाखल आहे. पुरवणी जवाबानंतर अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगावसह जळगावातील गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्लीतील सीबीआय पथक दाखल झाले आहे.

सीबीआयचा आठ दिवस जळगावात डेरा
दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या पथकात हरजीतसिंग सचान आणि हरप्रीत या दोन्ही अधिकार्‍यांचा समावेश आहे. दोन्ही अधिकार्‍यांच्या पथकाकडून गुन्ह्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला जात आहे.

सुरज झंवर यांचा आज जवाब होणार
खंडणी प्रकरणात फिर्यादी सुरज सुनील झंवर यांना बुधवार, 18 रोजी बोलविण्यात आले असून त्यांच्या जबाबात अधोरेखित होणारे नावे असलेल्या इसमांना सुद्धा जबाबाला बोलविण्यात येईल, अशी शक्यता आहे. चाळीसगाव येथे दाखल गुन्ह्यात आयुष मणियार व विशाल पाटील यांच्यासमोर खंडणी मागण्याचा फिर्यादित उल्लेख आला असल्याने सुरज झंवर यांनी सीबीआय समोर दोघांची नावे जबाबात उल्लेख केल्यास त्यांचासुद्धा जबाब होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली

अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी नष्ट केलेल्या पुराव्यांची होणार चौकशी
जळगाव जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयात घुसून मारहाण, कागदपत्रे चोरीप्रकरणात गुन्हा दाखल होता होताच जिल्हापेठ पोलिसांनी अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांना अटक केली व न्यायालयाने त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात तत्कालीन विशेष सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार कोणकोणते पुरावे नष्ट करण्यात आले ? याची चौकशी केली जाणार आहे. तसेच हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे का?, या दृष्टीनेही तपास होणार आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयीतांवर लवकरच अटकेची कारवाई होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !