दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

बामणोद, फैजपूर येथील तलाठी व सर्कल कार्यालयांना अचानक भेट ; अनावश्यक कागदपत्रांसाठी शेतकर्‍यांची अडवणूक न करण्याच्या सूचना


फैजपूर (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असताना अनावश्यक कागदपत्रांची अट घालून शेतकर्‍यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारींची आमदार अमोल जावळे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी बामणोद व फैजपूर येथील तलाठी आणि सर्कल कार्यालयांना अचानक भेट देत पंचनाम्याच्या प्रक्रियेची पाहणी केली आणि शेतकर्‍यांना विनाकारण कागदपत्रांसाठी कार्यालयांच्या फेर्‍या माराव्या लागू नयेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या.

आवश्यकता नसताना कागदपत्रे न मागण्याच्या सूचना
पंचनाम्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले आधारकार्ड, डीबीटीद्वारे मदत जमा करण्यासाठी आवश्यक बँक खाते तपशील आणि ग्रीस्टॅकशी संबंधित माहिती घ्यावी मात्र आवश्यकता नसताना 7/12 उतारा, 8-अ यांसारख्या कागदपत्रांची मागणी करू नये, असे आमदार जावळे यांनी स्पष्ट केले. आवश्यक कागदपत्रे घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुलभ पद्धतीने पूर्ण करावी आणि केवळ अनावश्यक कागदपत्रांअभावी कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. कागदपत्रांच्या नावाखाली त्याची अडवणूक करू नका आणि त्याला कार्यालयांच्या फेर्‍या मारायला लावू नका. आवश्यक माहिती घेऊन पंचनामे वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट शब्दांत आमदार जावळे यांनी अधिकार्‍यांना सुनावले.

पंचनाम्यांची घेतली माहिती
यावेळी त्यांनी कार्यालयीन कामकाजाची तसेच दुष्काळ पंचनाम्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. रावेर-यावल मतदारसंघातील सर्व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कार्यालयांनी याच पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, अनावश्यक कागदपत्रांबाबत निर्माण झालेल्या या प्रकाराची आमदार जावळे यांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाने यासंदर्भातील तत्काळ आदेश मागे घेतले त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत शेतकर्‍यांना अनावश्यक कागदपत्रांच्या अटीपासून दिलासा मिळणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी पंचनामे पारदर्शक, सुलभ आणि विनाविलंब पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही आमदार जावळे यांनी स्पष्ट केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !